शहरात माजी आमदार जयंत ससाणे यांनी १ हजार ७९८ घरकुले मंजूर करून आणली, पण गेल्या सात वर्षांत अवघ्या २५० घरकुलांचे काम झाले. १ हजार ५०० घरकुलांचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गोरगरिबांना घरकुलांपासून वंचित रहावे लागेल, अशी खंत माजी नगराध्यक्ष अंजूम शेख यांनी पालिकेच्या सभेत व्यक्त करून सत्तारूढ गटाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या सुरात सुर सत्तारूढ गटाचेच रिवद्र गुलाटी यांनी मिळवत वर्षांनुवर्षे नगर नियोजन योजनेचे काम सुरू असून गेली वीस वर्षे ते पडून आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे, अशी खंत व्यक्त केली.
नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विरोधी नगरसेविका भारती कांबळे व मंजुश्री मुरकुटे यांनी अनेक प्रश्न विचारून त्यांना धारेवर धरले. यावेळी सत्तारूढ गटाचे नगरसेवक व त्यांच्यात अनेकदा आरडाओरडा झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड यांनी विरोधक  प्रत्येक ठिकाणी राजकारण करतात. आम्ही ठरविले तर पाच मिनिटात सर्व विषय मंजूर करू शकतो, असे सुनावले. तर नवीन नगरसेविकांना विरोधकांच्या गोंधळामुळे बोलायला संधी मिळत नाही, असे सांगितले. शहरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत नळ जोडण्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
शहरात आठ झोपडपट्टय़ांमध्ये घरकुल योजना मंजूर झाली. त्यापैकी तीन ठिकाणी ५२६ घरकुलांचे काम झाले. एका घराला ७० ते ८० हजार रूपये पुर्वी लागायचे आता हा खर्च १ लाख ६० हजारांपर्यंत गेला आहे. योजनेतील अल्पसंख्यांकांची नावे ‘रमाई आवास योजने’त टाकण्यात आली. आता घरकुलांचा निधी परत जाण्याच्या माार्गावर आहे, असे शेख यांनी सांगितले. त्यावर मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना समाधनकारक खुलासा करता आला नाही. सभेत संजय छल्लारे, शाम अडांगळे, राजेश अलघ यांची भाषणे झाली.