मागील सिंहस्थात आपत्कालीन परिस्थितीसाठी उभारलेला स्वतंत्र कक्ष असो अथवा रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारलेली धर्मशाळा असो अथवा आमदार निधीतून अलीकडेच उभारलेला प्रतीक्षा कक्ष असो.. जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वतंत्र कक्षाचा वापर चक्क गोदाम म्हणून तर धर्मशाळेचा वापर कर्मचारी निवासस्थान आणि अतिरिक्त बाह्य रुग्ण तपासणी कक्षाच्या उभारणीसाठी करण्यात येत आहे. या दोन्ही जागांचा वापर रुग्णांच्या नातेवाईकांना होऊ शकला नसताना आमदार निधीतून उभारलेला प्रतीक्षा कक्षदेखील सुरक्षितता व तत्सम कारणे पुढे करून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात चालढकल केली जात आहे.
मागील सिंहस्थात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णांची व्यवस्था करता यावी म्हणून लाखो रुपये खर्च करून आठ ते दहा खोल्यांच्या स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण येत असतात. त्यांच्यासमवेत नातेवाईकही असतात. त्यांच्या तात्पुरत्या निवासाचा प्रश्न या कक्षामार्फत सोडविता येईल, अशी अपेक्षा होती. त्या अनुषंगाने खासगी रुग्णालयांप्रमाणे त्यात खास तसेच सर्वसामान्य असे विभाग पाडण्यात आले. रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्या वेळी खास खोलीसाठी २० रुपये आणि सर्वसामान्यांसाठी नि:शुल्क स्वरूपात तो उपलब्ध करून दिला जात होता. सिंहस्थानंतर काही काळ या कक्षाचा वापर विश्रांती कक्ष म्हणून झाला, मात्र त्यानंतर हा कक्ष रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आजतागायत बंद आहे. विश्रांती कक्ष बंद केल्यानंतर रुग्णालयाने त्याचा वापर काही काळ मनोरुग्ण विभागासाठी केला. सध्या या कक्षात जिल्हा रुग्णालयाला लागणारा सर्व प्रकारचा औषधसाठा ठेवण्यात आला आहे. म्हणजे रुग्णालयाचे ते गोदाम बनले आहे. या कक्षाची ही गोष्ट असताना रुग्णालय आवारात क्षय रोग आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस बांधण्यात आलेल्या धर्मशाळेची वेगळी स्थिती नाही. रात्री-बेरात्री किंवा बाहेरगावाहून रुग्णासमवेत येणाऱ्या नातेवाईकांना विश्रांती घेता यावी यासाठी ही धर्मशाळा खुली होती. काही वर्ष तिचा वापर त्याच कारणासाठी झाला. मात्र नंतरच्या काळात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान म्हणून तिचा वापर सुरू झाला. तो आजतागायत कायम आहे. कक्षातील काही खोल्यांमध्ये कर्मचारी राहत असून काही भागाचे नूतनीकरण करून रुग्णालयाचा अतिरिक्त बाह्य़रुग्ण विभाग त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.  रुग्णालयाच्या दर्शनी भागात आमदार निधीतून रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्षाची उभारणी करण्यात आली. मात्र अद्याप हा कक्ष देखील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खुला झालेला नाही. तसेच रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराशेजारी खुल्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची हक्कांची ठिकाणे हिरावून घेत रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांची व्यवस्था खुल्या वातावरणात किंवा विविध विभागाच्या बाहेरील मोकळ्या जागेत केली आहे. याबाबत काही संघटनांनी जाब विचारण्याचा किंवा माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाकडून त्यांची बोळवण झाली.