ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १३ रिसॉर्ट व हॉटेल मालकांकडे २ लाख ६२ हजाराचे कंझव्‍‌र्हेशन शुल्क थकित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एप्रिल ते जून या त्रमासिक शुल्काचा भरणा केला नसतांनाही सर्व हॉटेल्स सुरू असून क्षेत्र संचालकांनी वारंवार नोटीसा दिल्यानंतरही शुल्क भरण्यास  रिसॉर्ट मालक टाळाटाळ करत आहेत. दरम्यान, ३० सप्टेंबरपूर्वी शुल्क जमा करावे अन्यथा, प्रवेश बंदी करून व्याघ्र प्रकल्पाचे सर्व प्रवेशव्दार, तसेच बेवसाईटवर मालकांची नावे प्रसिध्द करण्याचा इशारा दिला आहे.
पट्टेदार वाघांच्या अस्तित्वाने देश-विदेशात प्रसिध्दीस आलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आज एकूण चौदा रिसॉर्ट व हॉटेल्स आहेत. यात एकूण १४२ सूटस् आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील रिसॉर्ट मालकांकडून कंझव्‍‌र्हेशन शुल्क गोळा करण्यात येते. एका रिसॉर्टमध्ये दहा कक्षापर्यंत प्रती महिना एका सुटसाठी ५०० रुपये, तर दहा कक्षाच्यावर प्रती महिना एका सुटसाठी ७५० रुपये कंझव्‍‌र्हेशन शुल्क वसूल करण्यात येतो. राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग अध्यादेशान्वये बफर क्षेत्रातील सर्व पर्यटन उद्योगासंबंधी निवास सुविधांवर कंझव्‍‌र्हेशन शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार दर तीन महिन्याने हा शुल्क रिसोर्ट व हॉटेल्स मालकांकडून वसूल केला जातो, परंतु एप्रिल ते जून २०१३ या त्रमासिकाचा शुल्क रिसोर्ट मालकांनी अजूनही जमा केलेला नाही. ताडोबातील १३ रिसॉर्ट व हॉटेल्सकडे २ लाख ६२ हजाराचे कंझव्‍‌र्हेशन शुल्क थकित आहे. ही रक्कम कार्यकारी संचालक ताडोबा-अंधारी टायगर कंझव्‍‌र्हेशन प्रतिष्ठानकडे जमा केली जाते. यातील कोलारा गेटजवळील छावा या एकमेव रिसॉर्टने १० हजार ५०० रुपये शुल्क जमा केलेला आहे, तर उर्वरीत १३ रिसॉर्ट मालकांना तातडीने शुल्क जमा करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.
वारंवार नोटीस बजावल्यानंतरही या हॉटेल्स मालकांनी शुल्क जमा केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. थकित रिसॉर्ट मालकांच्या यादीत मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील सारस रिसॉर्टकडे १३ हजार ५००, रॉयल टायगर रिसॉर्ट २९ हजार २५०, ताडोबा टायगर रिसॉर्ट ३१ हजार ५००, वनविकास महामंडळाचे निसर्ग पर्यटन संकुलाकडे २१ हजार, एमटीडीसी रिसॉर्ट २१ हजार, इरई रिट्रीट रिसॉर्ट ३१ हजार ५००, सराई टायगर रिसॉर्ट २७ हजार, टायगर ट्रेल रिसॉर्ट खुटवंडा ३१ हजार ५००, स्वरासा रिसॉर्ट, कोलारा २७ हजार, गौरव नेचर स्टे रिसॉर्ट ४ हजार ५००, होप ईन रिसॉर्ट, कोलारा ९ हजार, निसर्ग पर्यटन संकुल कोलारा १० हजार ५००, हेवन रिसॉर्ट, खडसंगी ४ हजार ५०० रुपये शुल्क थकित आहे. या सर्व रिसॉर्ट मालकांनी ३० सप्टेंबरपूर्वी हे शुल्क जमा केले नाही तर ताडोबात प्रवेश बंदी करण्याचा तसेच हॉटेल मालक व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जिप्सींनाही ताडोबात प्रवेश देण्यात येणार नाही, तसेच ताडोबाच्या सर्व सहा प्रवेशव्दारांवर हॉटेल व रिसॉर्ट मालकांची नावे फ्लेक्स बोर्डवर लावण्याचा व महाइकोटूरिझमच्या बेवसाईटवर नावे प्रकाशित करण्याचा इशारा क्षेत्र संचालकांनी दिला आहे.