सरलेले वर्ष हॉटेल उद्योगाच्या दृष्टीने काहीसे मंदीचे ठरल्याने परदेशी स्वारी काहीशी स्वस्तात ‘पटेल’ असे मांडे मनातल्या मनात खात आपली पर्यटनाची योजना आखत असाल तर सावधान! कारण २०१३ हे व्यावसायिकांसाठी मंदीचे असले तरी त्यामुळे हॉटेलच्या दरांमध्ये फरक पडलेला नाही. उलट २०१३मध्ये हॉटेलचे दर आधीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी वाढलेलेच आहेत. त्यामुळे, २०१४मध्येही परदेशी जाणाऱ्यांना हॉटेलवरील खर्चाकरिता आपले ‘बजेट’ चढेच ठेवावे लागणार आहेत.
२०१३मध्ये हॉटेलचे दर एका रात्रीसाठी सरासरी ५,२५४च्या आसपास होते. तर त्याच्या आधीच्या वर्षी २०१२मध्ये ते ४,९४२ होते. ‘हॉटेल प्राइज इन्डेक्स’ने या संदर्भात प्रकाशित केलेल्या अहवालात ही नोंद घेण्यात आली आहे. जगभरातील महत्त्वाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये झालेले बुकिंग आणि त्यासाठी ग्राहकांनी मोजलेले पैसे यावर हा अहवाल तयार केला जातो. या अहवालानुसार आशियामध्ये सर्वाधिक वाढ मकाव येथील हॉटेलाच्या दरांमध्ये झाली आहे. येथील हॉटेलचे दर प्रत्येक रात्रीकरिता २९ टक्क्यांनी (एक रात्र १२,३२१) असे वाढले आहेत. त्या खालोखाल थायलंडमधील दर १३ टक्क्यांनी (५,६६७) वाढले आहेत. तर फिलिपिन्समधील दर ११ टक्क्यांनी (६,४२०) वाढले आहेत. येनमध्ये घसरण होऊनही जपानमधील हॉटेलचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत हे विशेष. जपानमध्ये भारतीय पर्यटकांना एका रात्रीकरिता ८१९५ रुपये मोजायला हवेत.
युरोपमध्ये आर्यलंडमध्ये हॉटेलचे दर सर्वाधिक म्हणजे ४१ टक्क्यांनी (एक रात्र ८,२१६) वाढले आहेत. तर रशियामध्ये हॉटेलसाठी भारतीयांना आधीच्या तुलनेत किमान २३ टक्के (१३,५६७) अधिक किंमत मोजावी लागणार आहे. ग्रीस (८,४३५) आणि पोर्तुगल (५,७८४) या आर्थिक मंदीने झाकोळलेल्या देशांमध्येही हॉटेलचे दर अनुक्रमे १८ आणि १७ टक्क्यांनी वाढले आहेत, हे विशेष. तर पोलंड (५,३३८) या एकमेव देशात हॉटेलचे दर नऊ टक्क्यांनी कमी झाले आहेत. लॅटीन अमेरिकेतील मेक्सिको (८,४७५) येथे २५ टक्क्यांनी हॉटेलचे दर वाढले आहेत. तर अमेरिका (९,४४६) आणि कॅनडात (९,०१७) १८ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत (८,१३६) १२ टक्क्यांनी हॉटेलचे दर वाढले आहेत.
भारतात मात्र हे चित्र काहीसे वेगळे दिसते. गोव्यात (५,९२७) ९ टक्क्यांनी हॉटेलचे दर वाढले आहेत. तर कोलकाता (६,४३३), बंगळुरू (६,२१५) आणि कोचीन (५,२९०) या ठिकाणी ते चार टक्क्यांनी वाढले आहेत. चेन्नईमध्ये (५,८९७) मात्र आठ टक्क्यांनी हे दर कमी झाले आहेत. हैदराबाद (५,५०९) आणि पुण्यात (५,२४३) अनुक्रमे ७ आणि ५ टक्क्यांनी ते कमी झाले आहेत. पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांमध्ये भारतातील हॉटेलांवर सर्वाधिक खर्च करणारे युरोपीय आहेत. त्यातही बेल्जियम, फिनलंड, इटली हे देश भारतातील हॉटेलांमध्ये जास्त पैसे खर्च करतात.