महापौर असल्यापासून कोणता पैसा कुठे खर्च करायचा, याचे काटेकोर नियोजन करण्याची सवय यापुढेही कायम राहणार आहे. बालगृहासाठी आमदार निधीतून सोलर वॉटर हिटरसाठी दिलेला निधी सत्कारणी लागल्याचे पाहून मनोमन समाधान वाटत आहे, असे प्रतिपादन आमदार वसंत गिते यांनी केले.
शहरातील उंटवाडी रस्त्यावरील मुला-मुलींच्या निरीक्षण व बालगृहात वसंत गिते यांच्या आमदार निधीतून सोलर वॉटर हिटर कार्यान्वित करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ होते.
प्रारंभी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. जेथे जेथे आमदार निधीतून मदत करता येईल, तेथे आपण सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील असून जनतेशी निगडित असलेल्या सरकारी कार्यालयांतही आपण वेगवेगळ्या कामांसाठी आमदार निधी दिल्याचे गिते यांनी यावेळी सांगितले.
महापौर अ‍ॅड. वाघ यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्तविकात संस्थेचे मानद सचिव चंदुलाल शाह यांनी आमदार वसंत गिते यांनी  महापौर असतानाही संस्थेस मदत केल्याची आठवण सांगितली. संस्थेशी जिव्हाळ्याचे  संबंध ठेवून आजही  त्यांचे संस्थेवरील प्रेम कायम ठेवले.
महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनीही आपल्या मानधनाची रक्कम निरीक्षण गृहासाठी देण्याचे जाहीर केले असल्याने समाजातील वेगवेगळ्या घटकांतील व्यक्तींच्या  सहकार्यातून ही संस्था आदर्श ठरली असल्याचे शाह यांनी सांगितले.