कोटय़वधी चौरसफूट एफएसआय तयार होणार
शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर करताना या आराखडय़ाला देण्यात आलेल्या २३ उपसूचना मंजूर झाल्या, असे चित्र वरकरणी दिसत असले, तरी प्रत्यक्षात शेकडो उपसूचना मंजूर झाल्या असून बहुतेक उपसूचना भूखंड निवासी करावेत, आरक्षण उठवावे, डोंगरमाथा रद्द करावा, रस्ता हलवावा, रस्ता रद्द करावा अशा स्वरुपाच्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विकास आराखडा मंजुरीसाठी सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास खास सभेत मतदान सुरू झाले. आराखडय़ाला ५४ उपसूचना देण्यात आल्या होत्या. त्यातील १० उपसूचना मागे घेण्यात आल्या, २० नामंजूर करण्यात आल्या आणि एक उपसूचना अनुमोदक नसल्यामुळे वगळली गेली. उर्वरित २३ उपसूचना मंजूर झाल्या. या उपसूचनांचा तपशील मंगळवारी समजला. वरवर दिसायला या २३ उपसूचना असल्या, तरी प्रत्यक्षात उपसूचना एक; पण त्यात तीस, चाळीस, पन्नास उपसूचना असा प्रकार झाल्याचे आता दिसत आहे.
काँग्रेसकडून एक उपसूचना आली असली, तरी त्या एका उपसूचनेत एकूण १२३ उपसूचना आहेत. तसेच मनसेच्या सदस्यांनी दिलेल्या एका उपसूचनेत ३१ उपसूचनांचा आणि अशाचप्रकारे राष्ट्रवादीने दिलेल्या एकाच उपसूचनेत २५ उपसूचनांचा समावेश आहे. शिवसेनेच्या सदस्यांनीही एकच उपसूचना दिल्याचे दिसत असले, तरी त्यातही ३१ उपसूचनांचा समावेश आहे. अशाप्रकारे चार उपसूचनांमध्ये २१० उपसूचना समाविष्ट आहेत. उर्वरित १९ उपसूचनांमधील काही उपसूचनांमध्येही एकापेक्षा अधिक उपसूचना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या उपसूचनांच्या माध्यमातून जुन्या हद्दीत मोठय़ा प्रमाणावर निवासीकरण होत असल्याचेच चित्र असून त्यातून कोटय़वधी चौरसफूट एफएसआय आणि टीडीआर तयार होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. महापालिका प्रशासनाने प्रथम त्यांच्या स्तरावर त्यानंतर शहर सुधारणा समिती स्तरावर आणि त्यानंतर सोमवारी मुख्य सभेत अशा तीन प्रक्रियांमध्ये शेकडो आरक्षणे बदलण्यात आली असून त्याचा भर निवासीकरणासह
रस्ते हलवणे, रस्त्यांची रुंदी कमी करणे, रस्ते हलवणे, भूखंडांवरील आरक्षणे उठवणे, वेगवेगळे प्रकल्प प्रस्तावित करणे अशा आशयाच्या बहुसंख्य उपसूचना देण्यात आल्या आहेत.