केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर मागासवर्गीय समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ता मीच असून, आपण लातूरचे खासदार म्हणून चांगली कामगिरी बजावली असल्याचा दावा खासदार जयवंत आवळे यांनी येथे केला. पक्षाने आदेश दिल्यास तर लातूरच काय? कर्नाटक, आंध्रातील मतदारसंघातही आपण उभे राहू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत आवळे म्हणाले, की विलासराव देशमुखांनी आपल्याला लातूरला आणून खासदार केले. निवडून आल्यानंतर आपण लातूरकडे ढुंकून पाहणार नाही, असा समज अनेकांनी करून घेतला होता, मात्र, ४०० किलोमीटर अंतरावरून आल्यानंतरही येथील जनतेने आपल्याला निवडून दिले. त्यामुळे त्यांच्याशी प्रतारणा करायची नाही, अशी भूमिका आपण घेतली व गेल्या तीन-चार वर्षांत आपण लोकांच्या सतत संपर्कात आहोत. लोकसभेत १०० टक्के उपस्थिती असणारा खासदार म्हणून आपल्याला ओळखले जाते. मतदारसंघातील सर्व तालुकाध्यक्षांकडे हृदय व कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी द्यावयाची पत्रे देऊन ठेवली आहेत. आतापर्यंत सुमारे ६० लाख मदत गरजूंना देण्यात आली. खासदार निधीचे वाटप करताना सर्वाना न्याय दिला. लातुरात गट-तटाचे राजकारण केले नाही. खासदार निधी वितरित करताना कोणाच्या अर्धा कप चहालाही मिंधा राहिलो नाही, हेही सांगायला ते विसरले नाहीत.
लातूर जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येकी ५ लाख निधी त्यांच्या मतदारसंघातील कामासाठी दिला. ही रक्कम सुमारे १ कोटी ७५ लाख आहे, तर लातूर महापालिका क्षेत्रात १ कोटी ६० लाख निधी गतवर्षी दिला. विलासराव देशमुखांच्या नावाने मागासवर्गीय सूतगिरणी उभारली जाणार असून, त्यात २ हजारजणांना रोजगार मिळेल. विलासरावांचे सर्वात मोठे स्मारक आपण उभारणार असल्याचेही ते म्हणाले. जिल्हय़ातील पाण्याचा प्रश्न, रेल्वे सुविधांचा प्रश्न याचा पाठपुरावा आगामी काळात करणार असल्याचे आवळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am great in state after sushilkumar shinde
First published on: 30-01-2013 at 12:15 IST