रणरणत्या उन्हाने तापलेल्या जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येने भीषण स्वरूप प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील तब्बल ८२१ गावांना या समस्येने घेरले असून त्यातील १०८ गावांना सध्या ९० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शासन टँकरची संख्या वाढविण्याची तयारी दर्शवीत असली तरी आणखी पाणी आणणार कोठून, हा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर आहे.
जळगाव जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे पाण्याची पातळी अतिशय खोलवर गेली आहे. त्यातच आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात तापमानही ४२ अंशांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील हतनूर धरण वगळता उर्वरित सर्वच धरणांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या विस्तारून ८२१ वर पोहोचली आहे. त्यातील भीषण दुर्भिक्ष सोसणाऱ्या १०८ गावांना जिल्हा प्रशासन ९० टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. हे संकट दिवसेंदिवस बिकट होत असल्याने इतरही गावांकडून टँकरची मागणी केली जाऊ शकते. या गावांची संख्या आणखी वाढल्यास टँकर तर आहेत, मात्र पाण्याची उपलब्धता कशी करायची याची चिंता प्रशासनाला सतावत आहे. टंचाईचे संकट दूर करण्यासाठी याआधी प्रशासनाने २५७ विहिरींचे अधीग्रहण केले आहे. तहान भागविण्यासाठी आणखी खासगी विहिरींचे अधीग्रहण केले जाणार आहे. त्याचबरोबर नवीन विंधन विहिरी, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, नळ पाणीपुरवठा योजना, विहिरींचे गाळ काढणे आदी उपाययोजना राबविल्या जात आहेत.
जळगाव शहरात सद्यस्थितीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर धरणानेही तळ गाठल्याने कपातीचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत. म्हणजे तीन अथवा चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. तथापि, पाच लाख लोकसंख्येच्या जळगावची तहान भागविण्यासाठी वाघुरचा मृतसाठा वापरण्याकरिता विशेष योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. गिरणा धरणातून शहराला आवर्तन मिळावे, यासाठी महापौर किशोर पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. महापौरांनी औद्योगिक विकास महामंडळाकडूनही पाणी घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यास जळगावकरांना काहीअंशी दिलासा मिळू शकतो. यामुळे तीवट्रंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचा विश्वास महापौर किशोर पाटील यांनी व्यक्त केला.