आपल्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीत अनधिकृत बांधकामाविरोधात जोरदार मोहिमा राबविणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या आक्रमकतेला मुंब्रा-कौसा आणि दिवा भागातील भूमाफिया फारशी भीक घालत नाहीत हे गुरुवारच्या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून लकी कंपाउंड येथील दुर्घटनेत अनेक निष्पाप जिवांचा बळी घेतल्यानंतरही शुक्रवारी याच परिसरातच अनधिकृत बांधकामांचे इमले अगदी बिनधोकपणे उभे राहात असल्याचे धक्कादायक दृश्य नजरेस पडत होते. ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या दिवा परिसरातील एका अनधिकृत चाळीविरोधात कारवाई थांबविण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागणारे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्याम थोरबोले यांना दोन महिन्यांपूर्वी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली तेव्हाच राजीव यांच्या प्रयत्नांना महापालिकेतूनच कसा हरताळ फासला जात आहे हे दिसून आले. याच भागातील महापालिकेचे उपायुक्त दीपक चव्हाण अनधिकृत बांधकामांना अभय देत असल्याचे जाहीर आरोपही यापूर्वी झाले आहेत. आर. ए. राजीव यांच्यासारखा खमक्या आयुक्त असताना मुंब्रा, कौसा, दिवा भागातील अनधिकृत बांधकामांना आळा बसेल, अशी अपेक्षा या भागातील सर्वसामान्य नागरिक बाळगून होते. मात्र, गुरुवारच्या घटनेमुळे ती फोल तर ठरलीच शिवाय शुक्रवारीही हिरव्या शाली पांघरून या भागात अनधिकृत बांधकामांचे इमले रचले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंब्रा, कौसा, दिवा भागांतील अनधिकृत बांधकामे या भागातील नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून राजीव यांनी अतिक्रमणांविरोधात जाहीर भूमिका घेत ठाण्यासह कळवा, मुंब्रा भागांतील फेरीवाले तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली. मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या परिसरात बऱ्यापैकी फेरीवाला मुक्त करून राजीव यांनी सर्वाची वाहवा मिळवली. दिवा, मुंब्रा, कौसा भागांतील काही अनधिकृत इमारतीही महापालिकेने जमीनदोस्त केल्या. राजीव यांच्या या कडक धोरणानंतरही मुंब्रा, दिवा, कळवा, खारेगाव परिसरात अनधिकृत बांधकामांचे इमले रोखण्यात महापालिकेस अपयश का येते, याचे कोडे मध्यंतरी सहाय्यक आयुक्त थोरबोले यांच्या अटकेमुळे अनेकांना उलगडले. या भागातील एका अनधिकृत चाळीला अभय देण्यासाठी दीड लाख रुपये मागणारे थोरबोले दोघा पोलीस कर्मचाऱ्यांसह रंगेहाथ पकडले गेले. तेव्हाच राजीव यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीला तडा गेल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली होती. दिवा परिसरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत चाळींसोबत ७-८ मजल्यांचे टॉवरही उभे राहात आहेत. पूर्वी खाडीच्या जागेत भराव टाकून चाळी उभारल्या जात असत. आता या चाळींच्या जागी अनधिकृत टॉवर उभे राहू लागल्याने स्थानिक नागरिक तोंडात बोटे घालू लागले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत हे सर्व घडत असताना मुजोर अधिकाऱ्यांपुढे खमके राजीवही कसे हतबल आहेत, याची चर्चा आता ठाणे शहरात उघडपणे सुरू झाली आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या मोटय़ा अपघातानंतर या भागातील अनधिकृत बांधकामांविरोधात आता जोरदार मोहीम सुरू होण्याची शक्यता असली तरी शुक्रवारी दिवसभर मात्र भूखंड माफियांना याची पर्वा नव्हती, असेच चित्र दिसून आले. लांबलचक हिरवा पडदा लावून मुंब्रा, कौसा, दिवा भागांत शुक्रवारी अनधिकृत बांधकामांचे इमले रचले जात होते. दुर्घटनास्थळी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांच्या रांगा लागल्या असताना ही बांधकामे सुरूच होती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. या सर्व परिसरात सुमारे ६० ते ७० अनधिकृत इमारती उभ्या राहत असून जवळच्या दिवा गावात भराव टाकून काही इमारतींचा पाया रचण्याचे कामही सुरू होते. ठाण्याच्या पलीकडे नाशिक-भिवंडी रस्त्यावर खाडी बुजवून खारफुटींची बेमालूमपणे कत्तल सुरू असल्याचे दिसून आले. गुरुवारच्या दुर्घटेनंतरही अशी बांधकामे सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.