जिल्ह्यातील ८१ वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधी जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरूच असून गेल्या दोन दिवसात ५ ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाहून नेली जाणारी वाळू पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी जप्त केली.
जिल्ह्यात विलंबाने होत असलेल्या वाळूघाटांच्या लिलाव प्रक्रियेचा फायदा घेत वाळू माफियाने जिल्हाभरात चांगलाच हैदोस घातला आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक ठिकाणांहून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करण्यात आले. महसूल विभाग आणि पोलिसांच्या तावडीत काही वाळू तस्कर सापडले, पण अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. रात्री देखील वाळूची वाहतूक करण्यात येत होती. रविवारी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी टी-पॉइंटजवळ पोलीस पथकाला एम.एच. ३२/ पी २०७७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून विना रॉयल्टी १ ब्रास वाळू वाहून नेताना आढळून आले. पोलिसांनी ट्रॅक्टरचालक चेतन ऊर्फ जीवन मारुती बागडे (२२, रा. पळसखेड) याच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. शनिवारी एकाच दिवशी ३ ट्रॅक्टर्स पकडण्यात आले. चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसेगाव मार्गावरील कुरळपूर्णा फाटय़ावर विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहून नेली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी जुबेरशहा जमशेरशहा (२५, रा. कुरळपूर्णा) याच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा नोंदवून ट्रॅक्टर आणि वाळू जप्त केली. मंगरूळदस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तलाठी यादव माणिक झरबडे यांना ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या चंद्रभागा नदीपात्रातील वाळू वाहून नेली जात असल्याचे तपासणीदरम्यान लक्षात आले. आरोपी ट्रॅक्टरचालक नीलेश बिरे याने निंभोरा बोडखा येथे वाळू खाली करून पळ काढला.
समरसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रासेगाव टी-पॉइंटवर एम.एच. २७ / एल ३६९ आणि एम.एच.२९/व्ही १७११ क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलींमधून वाळू नेली जात होती तेव्हा कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ट्रॅक्टरचालक भूषण हिंगे, उमेश आणि ट्रॅक्टर मालक शेख नईम शेख विसू यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. काही दिवसांपूर्वी चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड शेतशिवारात एका ठिकाणी अवैधरीत्या वाळूचा ढिगारा लावण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. परिसरातील नदी-नाल्यांमधून वाळूचा अवैधरीत्या उपसा करून ही वाळू विक्रीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आली होती. या साठय़ाचा आता लिलाव करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal sand extraction in amravati district
First published on: 20-01-2015 at 06:04 IST