कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील पाचव्या टप्प्यात अहमदनगर जिल्हय़ाला ४८.८० कोटीचा निधी प्राप्त झाला असून सुमारे ४०६७१ हेक्टर क्षेत्रावर या योजनेची अंमलबजावणी होईल. नगर जिल्हय़ातील २३० गावांमध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम पाच टप्प्यात आतापर्यंत राबविण्यात आला. यासाठी जिल्हय़ाला १५५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सन २००९-१०पासून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम नगर जिल्हय़ात केंद्र शासनाच्या भूसंसादन विभागाच्या सामायिक मार्गदर्शन सूचनांप्रमाणे राबवण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी ग्रामसभेने निवडलेल्या पाणलोट समितीमार्फत करण्यात येत आहे. गावाच्या गरजेनुसार व मागणीनुसार हे प्रकल्प कार्यान्वित होत असून मृद् व जलसंधारणाचे उपचार, भूमिहीन, व स्वयंसहायता गट यांच्यासाठी उपजीविकेचे व्यवसाय सुचवून प्रकल्पामध्ये उपभोगता गटांचे लाभार्थी तसेच पाणलोट समिती क्षेत्रीय अधिकारी यांच्या क्षमताबांधणीसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे.
जिल्हय़ात या योजनेचा पाचवा टप्पा आता सुरू होत असून यामध्ये राहाता तालुक्यातील दोन प्रकल्पांचा समावेश असून आडगाव, खडकेवाके, केलवड, अस्तगाव परिसरातील २४ गावे संगमनेर तालुक्यातील तळेगाव, वडझरी, चिंचोली गुरव, सोनोशी या परिसरातील १७ गावे, तर राहुरी तालुक्यात एक प्रकल्प, कर्जत तालुक्यात १, अकोले तालुक्यात ४, अशा एकूण ९६ गावांचा समावेश या पाचव्या टप्प्यात प्राधान्याने करण्यात आला आहे. जिल्हय़ातील दुष्काळी पट्टय़ातील तालुक्यांना प्राधान्य देऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने दुष्काळी पट्टय़ातील गावांना भविष्यात या योजनेचा मोठा लाभ होईल.
अहमदनगर जिल्हय़ामध्ये सन २००९-१० मध्ये संगमनेर, राहुरी, पाथर्डी या तालुक्यांत ११७२२ हेक्टर क्षेत्रावर १४.०६ कोटी रकमेचा निधी उपलब्ध झाला. सन २०१०-११ या आíथक वर्षांत जिल्हय़ातील श्रीगोंदा तालुक्यात ३, जामखेड तालुक्यात ४ याप्रमाणे सात प्रकल्प मंजूर आहेत. या तालुक्यामधील २८,०३८ एवढे हेक्टर क्षेत्र उपचारित होणार असून यासाठी ३३.६४ कोटी रुपये उपलब्ध होतील तर २०११-१२ या आíथक वर्षांत पाथर्डी व शेवगाव या तालुक्यांत ४ प्रकल्प मंजूर झाले असून सुमारे १८१५६ हेक्टर क्षेत्रासाठी २१.७८ कोटी उपलब्ध होतील, तर सन २०१२-१३ या आíथक वर्षांत अनुक्रमे नगर तालुक्यात ३, पारनेर तालुक्यात ३, संगमनेर अकोले तालुक्यात १ असे सात प्रकल्प मंजूर आहेत. ३११७६ हेक्टर क्षेत्रासाठी ३७.४१ कोटीचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
यासाठी लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य वाढविण्यात येते. पाणलोटातील शेतीची उत्पादकता वाढवण्याबरोबरच उत्पन्नवाढीसाठी शेतकरी, शेतमजूर व भूमिहीनांसाठी उदरनिर्वाहाची साधने तयार करण्यासाठी वेगवेगळय़ा उपाययोजनांची तरतूद कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2013 रोजी प्रकाशित
कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखेंच्या प्रयत्नातून २३० गावांत कामांची अंमलबजावणी
कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील पाचव्या टप्प्यात अहमदनगर जिल्हय़ाला ४८.८० कोटीचा निधी प्राप्त झाला असून सुमारे ४०६७१ हेक्टर क्षेत्रावर या योजनेची अंमलबजावणी होईल.

First published on: 05-10-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Implementation attempts agriculture minister radhakrishna vikhe of integrated watershed management