आयएमएससीडीआर या संस्थेने नगर शहरात व्यवस्थापन क्षेत्राबरोबरच व्हिडीओकॉन अकादमीच्या माध्यमातून पारंपारिक भारतीय कला जोपासण्यात महत्वाची जबाबदारी उचलल्याचे रामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब गांधी यांनी सांगितले. आयएमएस व्हिडीओकॉन नृत्य अकादमीचा अकरावा वर्धापनदिन सोहळा नुकताच गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भा. पा. हिवाळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. एम. अ‍ॅस्टन होते. आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, डॉ. फिलीप बार्नबस, डॉ. एम. बी. मेहता, अकादमीच्या प्राचार्या माधवी सराफ आदी यावेळी उपस्थित होते.अ‍ॅस्टन यांनी यावेळी बोलताना आयएमएसमध्ये शिक्षण व कलेचा संगम झाल्याचे गौरवोदगार काढले. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टींना महत्व असुन ते ओळखुनच राबवण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत असे ते म्हणाले.सराफ यांनी प्रास्तविकास अकादमीच्या कार्याचा आढावा घेतला. अकादमीतील विविध वर्गातील विद्यार्थ्यांनींनी यावेळी पुष्पांजली, गणेशस्तवन, शिवास्तुती, वंदना-रास, त्रिताल, अष्टलक्ष्मी स्तोत्र, नविन तिल्लना अशा कथ्थक व भरतनाटय़ममधील विविध रचना सादर केल्या. ऋचा तांदुळवाडकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. डॉ. मेहता यांनी आभार मानले.