रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करताना पकडल्या गेलेल्या पुण्याच्या ट्रॅव्हल्स एजन्सीवाल्याकडून दोन हजारांची लाच घेताना सापडल्यानंतर हिसका मारून पळून गेलेल्या आरपीएफच्या हवालदाराला सीबीआयने अखेर अटक केली. त्यास दोन दिवसांची सीबीआय कोठडी मिळाली आहे.
कुर्डूवाडी रेल्वेस्थानकावरील आरपीएफ हवालदार गणेश अण्णा सातपुते यास पुण्यातील सीबीआयच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे लातूर व येडशी या दोन रेल्वेस्थानकांचे कार्यक्षेत्र होते. पुण्यातील राजलक्ष्मी टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स या नावाच्या एजन्सीचा विकास सुखदेव शिंदे हा रेल्वेची तिकिटे काळा बाजाराने विकत असताना त्यास हवालदार सातपुते याने पकडले व पैशाची मागणी केली होती. त्या वेळी शिंदे याने एक हजाराची रक्कम दिली. शिंदे याने हवालदार सातपुते यास दरमहा एका तिकिटामागे शंभर रुपये हप्ता देण्याचे ठरले होते. दरम्यान, हवालदार सातपुते याच्याविरुद्ध शिंदे याने तक्रार केली होती. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने कुर्डूवाडी रेल्वेस्थानकावर सापळा लावून हवालदार सातपुते यास लाच घेताना पकडले. परंतु आपण अडकणार हे लक्षात येताच हवालदार सातपुते याने सीबीआय अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले होते. त्यास अखेर अटक करण्यात आली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता झालेल्या सुनावणीत सरकारतर्फे अ‍ॅड. ए. के. सूर्यवंशी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. शशी कुलकर्णी व अ‍ॅड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले.