गणेशोत्सवाच्या काळात श्रींच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत विविध कार्यक्रमांचे दररोज सायंकाळी आयोजन करून परभणी शहर महापालिकेच्या वतीने परभणी फेस्टिव्हल यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला. लावणीपासून ते नाटकापर्यंत आणि भक्तीगितांपासून  ते भीमगीत रजनीपर्यंत सर्व कार्यक्रम या फेस्टिव्हलमध्ये घेण्यात आले.
परभणीकरांच्या मनोरंजनाची भूक भागविण्यासाठी पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर परभणी फेस्टिव्हल घेण्यात येईल, अशी घोषणा महापौर प्रताप देशमुख यांनी केली होती. त्यानुसार शहरात गणेशोत्सवादरम्यान स्टेडियम मदानावर हे कार्यक्रम पार पडले. ज्या दिवशी पाऊस येईल, त्या दिवशी नटराज रंगमंदिरात हे कार्यक्रम झाले. अनेक नामवंत शायरांच्या उपस्थितीत झालेला मुशायरा फेस्टिव्हलचे विशेष आकर्षण ठरला. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ कार्यक्रमाला भक्तीरसाच्या माध्यमातून वारकरीपरंपरेला उजाळा दिला, तर ‘सणांच्या ग माहेरी’ कार्यक्रमातून महिलांच्या सण-उत्सवांचे सांस्कृतिक सादरीकरण करण्यात आले. ७० कलावंतांचा सहभाग असलेला अशोक हांडे यांचा ‘मंगल गाणी दंगल गाणी’ हा कार्यक्रम वैशिष्टय़पूर्ण ठरला. पुस्तकांच्या पानातून या राज्य पुरस्कारप्राप्त नाटकाचा प्रयोगही स्थानिक कलावंतांनी सादर केला. प्रा. रविशंकर िझगरे यांनी लिहिलेल्या या नाटकात स्थानिक कलाकारांचा सहभाग मोठा होता.
फेस्टिव्हलदरम्यान महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यात रांगोळीपासून ते पाककला आणि नृत्यापासून ते जागर मंगळागौरी या कार्यक्रमांपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. महिलांसाठीच ज्ञान व मनोरंजनाचा समन्वय असलेली खुली प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. फेस्टिव्हलदरम्यान क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. फुटबॉल, बुद्धीबळ, कबड्डी, शटल बॅडिमटन, रस्सीखेच, टेबल टेनिस, स्केटींग अशा सर्व स्पर्धा या वेळी घेण्यात आल्या. मुलांसाठी चित्रकला स्पध्रेचेही आयोजन केले होते.
गणेश महासंघाच्या स्पर्धाचेही आयोजन
गणेशोत्सवादरम्यान गणेश महासंघाच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आमदार संजय जाधव, महापौर प्रताप देशमुख, माजी नगराध्यक्ष बंडू पाचिलग यांच्या पुढाकाराने महासंघाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. भजन स्पर्धा, श्रींच्या मुर्तीसमोरील देखाव्यांची स्पर्धा, विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यांची स्पर्धा अशा विविध स्पर्धाचे आयोजन यावेळी करण्यात आले. फेस्टिव्हलच्या माध्यमातून सांस्कृतीक उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न झाला.