ऐन सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सने दरात दामदुपटीपेक्षा अधिक वाढ केली. त्यामुळे दिवाळीदरम्यान प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला अधिक चाट बसणार आहे.
लातूर-पुणेसाठी प्रवाशांसाठी सेमी स्लिपरचे दर ३०० रुपये तर स्लिपरचे दर ४५० रुपये आहेत. दिवाळीच्या निमित्ताने खासगी ट्रॅव्हल्सने वाढवलेल्या दरानुसार सेमी स्लिपरसाठी ७०० रुपये तर स्लिपरसाठी १ हजार रुपये दर करण्यात आले आहेत. मुंबईला जाणाऱ्या  प्रवाशांना सेमी स्लिपरसाठी ४५० व स्लिपरसाठी ७०० रुपये मोजावे लागतात. आता सेमी स्लिपरसाठी ८०० रुपये तर स्लिपरसाठी १ हजार ५०० रुपये प्रवाशांना द्यावे लागणार आहेत. रेल्वेच्या वातानुकूल दुसऱ्या श्रेणीतील दर खासगी ट्रॅव्हल्सकडून आकारले जात आहेत. या दरावर कोणाचेच नियंत्रण नाही. प्रवाशांकडून किती भाडे घ्यावे? याचे सर्वाधिकार ट्रॅव्हल्सवाल्यांकडे आहेत. या दरवाढीचे सर्वाधिकार ट्रॅव्हल्सवाल्यांकडेच असल्यामुळे प्रवाशांना िखडीत पकडून त्यांची लूट केली जात आहे.
प्रवाशांची वाढती गरज एसटी महामंडळाकडून भागवली जात नसल्यामुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी कारभाराबद्दल ओरड सुरू आहे. अर्थात पुणे, मुंबईत नोकरी करणारे वर्षांतून दिवाळीनिमित्त एकदा गावाकडे येतात. तेव्हा होणारी ओरड तात्पुरती आहे, हे ट्रॅव्हल्सवाल्यांना माहिती असल्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात. दसऱ्यापूर्वी मुंबई, पुणे या शहरांसाठी गाडय़ा सोडताना निम्म्या प्रवाशांवरच गाडय़ा चालवाव्या लागत असल्यामुळे हा तोटा दिवाळी दरम्यान भरून काढण्यासाठी तिकिटाचे दरवाढ केली जाते, असे ट्रॅव्हल्सवाल्यांचे म्हणणे आहे.