इंडियन वॉटर वर्क्‍स असोसिएशनचे वार्षिक अधिवेशन १० ते १२ जानेवारी या कालावधीत पुण्यात होणार आहे. ‘पुढील पिढय़ांसाठी पाणी पुरवठा’ हा या अधिवेशनाचा मुख्य विषय असणार आहे.
अखिल भारतीय स्तरावर काम करणाऱ्या या इंडियन वॉटर वर्क्‍स असोसिएशनचे ४५ वे अधिवेशन या वेळी पुण्यातील ‘अल्पबचत भवन’ येथे होणार आहे. त्यात जलक्षेत्रातील तज्ज्ञ आपले शोधनिबंध सादर करतील. जलसंपत्तीची उपलब्धता व त्याच्याशी निगडित सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बाबी, जलसंपत्तीचे जतन, विविध स्रोत एकमेकांना जोडण्याची शक्यता आजमावणे, भूजलाचा वापर, प्रदूषण नियंत्रण, सांडपाण्यावर कमी खर्चात प्रक्रिया करण्याचे पर्याय इत्यादी विषयांवर अधिवेशनात विचारविनिमय केला जाणार आहे. खाऱ्या पाण्याचे गोडय़ा पाण्यात रूपांतर, सांडपाण्याचे व्यवस्थापन हेही विषय हाताळले जाणार आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तरुणांसाठी याच विषयावर विशेष चर्चासत्र असेल. तसेच, पुणे व कराड या दोन शहरांतील पाणीपुरवठय़ाची सद्यस्थिती आणि आव्हाने यावरही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता व्ही. आर. कल्याणकर यांनी दिली.