‘‘केवळ शोधनिबंधांची संख्या वाढण्यापेक्षा उपयुक्त संशोधन होण्याची जास्त आवश्यकता आहे, संशोधनाचा दर्जाही उत्तम असणे गरजेचे आहे,’’ असे मत अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिन विद्यापीठाचे नॅनो-टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अजित केळकर यांनी ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन अ‍ॅडव्हान्सेस इन पॉलिमेरिक मटेरियल्स अँड नॅनो-टेक्नॉलॉजी पॉलिटेक २०१२’ या परिषदेच्या उद्घाटन समारंभात  रविवारी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या अ‍ॅडव्हान्स रिसर्च सेंटर इन फार्मास्युटिकल्स सायन्सेस अँड अ‍ॅप्लाइड केमेस्ट्री, पूना कॉलेज ऑफ फार्मासी, सोसायटी ऑफ पॉलिमर सायन्स, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, सेंटर फॉर मटेरिअल्स इन इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सोसायटी ऑफ पॉलिमर सायन्सचे अध्यक्ष डॉ. एस. सिवराम, राष्ट्रीय रायायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. सोरव पाल, भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील, पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. वर्षां पोखरकर उपस्थित होते. या वेळी केळकर म्हणाले, ‘‘संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठे व उद्योग यांमधील समन्वय वाढण्याची गरज आहे. मूलभूत संशोधन हे विद्यापीठांमध्ये तर उपयोजित संशोधन हे उद्योग क्षेत्राकडून होण्याची गरज आहे.’’