तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी कोकण विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हातकणंगले तालुक्याचे विभाजन करून इचलकरंजी हा स्वतंत्र तालुका निर्माण करण्याच्या मागणीचा विचार करण्यात येईल असे पत्र महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांना दिले आहे.
आमदार हाळणकर यांनी सन २०१२च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हातकणंगले तालुक्याच्या विभाजनासंदर्भात कपात सूचना मांडली होती. त्यावर राज्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले आहे. विषयांकित हातकणंगले तालुका हा कोल्हापूर जिल्हय़ाच्या पूर्वेस वसला असून तालुका कृषी, सहकार व औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. एकूण ६० महसुली गावे असून १ नगरपालिका (इचलकरंजी) व १ नगरपरिषद (वडगाव), एकूण ६२ ग्रामपंचायती आहेत. भौगोलिक क्षेत्रफळ ६१,४७२ हेक्टर आहे. सन २००१च्या जनगणनेनुसार ७,०९,६२८ इतकी तालुक्यांची लोकसंख्या आहे. तालुक्याचे आकारमान बरेच मोठे असून सध्याचे पंचगंगा नदीपलीकडील रांगोळी, रेंदाळ, हुपरी, रुई, पट्टणकोडोली या गावांना हातकणंगले हे ठिकाण दळणवळणास बरेच गैरसोयीचे ठरते. त्यामुळे हातकणंगले तालुक्याचे विभाजन करून इचलकरंजी हा स्वतंत्र तालुका निर्माण करावा, अशी कपात सूचना अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हाळवणकर यांनी मांडली होती. त्याला सोळंके यांनी उत्तर दिले आहे.
हातकणंगले तालुक्याचे विभाजन करून इचलकरंजी हा स्वतंत्र तालुका निर्माण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी २९ जून २०१० व २१ मे २०११च्या पत्राद्वारे शासनाकडे सादर केला आहे. तालुक्याच्या विभाजनासंदर्भात निकष निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने १५ नोव्हेंबर २०११ रोजी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना समितीला करण्यात आल्या आहेत व त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच तालुका विभाजनासंदर्भात निर्णय घेत्यावेळी हातकणंगले तालुक्याचे विभाजन करून इचलकरंजी हा स्वतंत्र तालुका निर्माण करण्याच्या मागणीचा विचार करण्यात येईल, असे राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मंत्री सोळंके यांच्या पत्रामुळे हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाच्या प्रस्तावास गती तर मिळालीच आहे. त्याचबरोबर इचलकरंजी स्वतंत्र तालुकानिर्मितीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.