प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रेमवीराला थेट जेलची हवा खावी लागली. अध्र्यावर थांबलेल्या या प्रेमकहाणीला मुलीच्या जन्माने नवीनच वळण मिळाले. दोन्ही कुटुंबांतील कर्त्यांनी सामोपचाराने प्रकरण थांबवत अखेर आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली आणि दोन्ही प्रेमीयुगुलाने आपल्या ‘मैत्री’ या मुलीच्या साक्षीने सात फे ऱ्या घेऊन विवाहबद्ध झाले. अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी कन्यादान तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी माणुसकीचा ओलावा दाखवल्याने रविवारी हा विवाहसोहळा जिल्हा परिषद सभागृहात पार पडला आणि एका लग्नाची ‘तिसरी गोष्ट’ पूर्ण झाली.
बीड जिल्ह्य़ातील कोठरबन (ता. वडवणी) येथील विलास मुंडे याचे गावातीलच एका दलित समाजातील मुलीबरोबर प्रेमसंबंध जुळले. जन्मभर साथ देण्याच्या आणाभाकाही झाल्या. ऐन तारुण्यातील असलेल्या या प्रेमीयुगुलाची प्रेमकहाणी पुढच्या वळणावर पोहोचली. याच काळात मुलीला दिवस गेले आणि तिने लग्नाचा तगादा लावला. मुलगी इतर समाजातील असल्याने विलासच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला आणि प्रेमकहाणीत संघर्ष सुरू झाला. लग्नाला नकार देताच मुलीच्या आई-वडिलांनी ५ जानेवारी २०१२ ला थेट पोलीस ठाण्यात येऊन विलासविरुद्ध गुन्हा दाखल केला. परिणामी विलासला जेलमध्ये जावे लागले. इकडे दिवस गेलेल्या मुलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सामाजिक कार्यकर्त्यां मनीषा तोकले व इतरांनी मध्यस्थी करून या मुलीबरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव पुढे केला. दरम्यान, माजलगाव न्यायालयात सुनावणीसाठी जेलमधून विलासला आणण्यात आले. त्या वेळी त्याची प्रेयसी आपल्या मुलीला घेऊन विलासला न्यायालयात भेटली. मुलीला पाहताच विलासही भावनिक झाला व त्याने न्यायालयात आपण लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. न्यायालयानेही दोघांनी लग्न करावे, असा आदेश देऊन विलासची जामिनावर मुक्तता केली. सहा महिन्यांच्या जेलनंतर विलासच्या कुटुंबातूनही विवाहासाठी मान्यता मिळाली. अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून अखेर या अध्र्यावर थांबलेल्या प्रेमकहाणीला लग्नाच्या सोपस्काराने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी स्वत: जिल्हा परिषद सभागृहाचे तीन हजार रुपयांचे भाडे भरून सभागृह उपलब्ध करून दिले आणि रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मुलीच्या साक्षीने प्रेमीयुगुल सात फेरे घेऊन विवाहबद्ध झाले. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रेमकहाणीच्या लग्नाची ‘तिसरी गोष्ट’ पूर्ण झाली.