मागील २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदार संघात राजकीय वैमनस्यातून भाजपचे आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या प्रचार सभेवर सशस्त्र हल्ला करुन भाजप कार्यकर्त्यांचा खून केल्याच्या खटल्याप्रकरणी चार आरोपींना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने १८ ऑक्टोबपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
शेगाव येथे अक्कलकोट विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ २६ सप्टेंबर २००९ रोजी भाजपचे उमेदवार सिद्रामप्पा पाटील यांची सभा सुरु असताना त्यांचे प्रतिस्पर्धी तथा तत्कालीन गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे (काँग्रेस) यांच्या समर्थकांनी सशस्त्र हल्ला करुन सिद्रामप्पा पाटील यांच्या खुनाचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यात पाटील यांचे सहकारी भीमाशंकर कोरे (वय ५५) यांचा मृत्यू झाला होता. या खटल्यात सिध्दाराम म्हेत्रे, त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांच्यासह बाबुराव बसप्पा पाटील, प्रकाश बसप्पा पाटील, महादेव आण्णाराव पाटील, तम्माराव बसप्पा पाटील आदी २९ जणांविरुध्द सोलापूरच्या सत्र न्यायालयात खटला प्रलंबित आहे.
दरम्यान या खटल्यातील आरोपी बाबुराव पाटील, प्रकाश पाटील, तम्माराव पाटील व महादेव पाटील या चौघा आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केला होता, त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी प्रत्येकी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर चौघा आरोपींना १८ ऑक्टोबपर्यंत अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला. १८ ऑक्टोबर रोजी सरकार पक्षाची बाजू मांडली जाणार आहे.