गेल्या ५० वर्षांपासून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या जीवन विकास शिक्षण संस्थेत अंतर्गत वादाने टोक गाठले असून एकमेकांची उणीदुणी बाहेर काढण्यासाठी सचिव विजय वैद्य यांच्या विरोधात अध्यक्ष बाबुराव झाडे सरसावले आहेत. स्वत:चाच मुलगा मुख्याध्यापक झाला पाहिजे या हट्टापायी दोघेही इरेला पेटले असून एकमेकांवरील आरोपप्रत्यारोपांमुळे संस्थेतील गलथान कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
संस्थेच्या ग्रामीण भागात सहा शाळा, कॉन्व्हेंट, प्राथमिक शाळा, डी.एड. कॉलेज, रात्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये इत्यादी जवळपास १८-१९ युनिट आहेत. सुमारे २२५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असलेल्या या संस्थेत सचिव विजय वैद्य यांचा मुलगा केतन १९८८ ते १९९५ लिपीक पदावर आणि त्यानंतर बी.एड.करून शिक्षक झाला. केतन यांना पदवी परीक्षेत ४५ टक्क्यांपेक्षा फारच कमी टक्के असतानाही त्यांना बी.एड.ला प्रवेश मिळालाच कसा असा बाबुराव झाडे यांचा सवाल आहे. दुसरी बाब म्हणजे विजय वैद्य यांची स्नुषा अनघा केतन वैद्य, बी.एड. नसतानाही बोगस गुणपत्रिकेच्या आधारे त्या ग्रामसेवक झाली. त्या बी.एड.ची कोणत्याही विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण नाहीत. तरी ग्रामसेवक म्हणून त्यांची निवड केली गेली. प्रकरण अंगलट येईल म्हणून सुनेला राजीनामा देण्यास विजय वैद्य यांनी भाग पाडले. या दोन्ही नियुक्तयांना बाबूराव झाडे यांनी सचिव विजय वैद्य यांना जबाबदार ठरवले असून सुनेने तीन वर्षे पगार घेवून शासनाची दिशाभूल करून पैशाचा अपहार केल्याला आरोप सचिव वैद्य यांच्यावर केला आहे.
‘शिक्षकांच्या सन्मानासाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या शिक्षक भारतीच्या एस.बी. खेडीकर यांच्या स्वाक्षरीनिशी संबंधित तक्रार करण्यात आली आहे. स्वत: बाबुराव झाडे यांनी, माझा मुलगा उपाध्यक्ष असलेल्या शिक्षक भारतीनेच माहितीच्या अधिकारात हे प्रकरण बाहेर काढल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. शिक्षक भारतीचे एस.बी. खेडीकर यांनी या तक्रारीचे खंडन केले असून तो संस्थेचा अंतर्गत वाद असून त्याचा शिक्षक भारतीशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. तसेच तक्रारही खोटी असून माझी खोटी स्वाक्षरी केली असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाची बाब म्हणजे अनघा वैद्य यांची बोगस नियुक्ती आणि केतन वैद्य यांच्या बोगस नियुक्तीला १५ वषार्ंच्यावर कालावधी लोटला असतानाही संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून बाबुराव झाडे शांत कसे बसले या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, हा सर्व गलथान कारभार अलीकडेच उघडकीस आला असून ताबडतोब त्याची चौकशी करून शिक्षणाधिकाऱ्याच्या कानावर संबंधित प्रकरण टाकण्यात आले.
यासंदर्भात विजय वैद्य म्हणाले, आम्ही शिक्षक भारतीकडे कोणतीही तक्रार केली नसून संस्थेकडेही शिक्षक भारतीने कोणतीही माहिती विचारलेली नाही. बाबुराव झाडे यांना त्यांच्या मुलाला शिरसपेठच्या शाळेचा मुख्याध्यापक करायचे म्हणून हा सर्व त्रास देणे सुरू आहे. त्यांच्या मुलाच्या पुढे ४० च्यावर ज्येष्ठ शिक्षकांची यादी आहे.त्या सर्वाकडून ना हरकत पत्र घेतले.
 मात्र माझी मुलगी आणि मुलगाही सेवा ज्येष्ठतेत त्यांच्या मुलापेक्षा मोठे आहेत. असे असताना बाबुराव झाडे यांचा आग्रह अनाठायी आहे. बाबुराव झाडेंशी माझे ५२ वर्षांपासूनचे संबंध आहेत. खरे तर त्यांनी असे करायला नको.
शिक्षक भारतीच्या तक्रारीतही खेडीकर यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला आहे. मुलगा केतन याची बी.एड.साठीची निवड प्रॅक्टिस टिचिंग स्कुल(पीटीएस) अंतर्गत झाली असून त्यासाठी संस्थेने ठराव करून केतनला बी.एड.साठी पाठवले होते.  त्या ठरावावर बाबुराव झाडे यांची स्वाक्षरी आहे. पीटीएस कोटय़ांतर्गत केवळ पदवीधर असल्याची पात्रता हवी होती आणि ती मुलाजवळ असतानाही अशाप्रकारे आक्षेप घेणे चुकीचे आहे.