चोपडा शहरात बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर फाडल्याच्या कारणावरून रविवारी दंगल उसळली असतानाच दहशतवाद विरोधी पथकाने सिमीशी संबंध असल्याच्या संशयावरून जामनेर तालुक्यातील पाळधी येथील तिघांची चौकशी केली. दरम्यान, विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी जिल्हयात अजुनही सिमी सक्रिय असल्याचे सांगत याबाबत आपण अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे.
नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाने मराठवाडय़ातील काही भागात दहशतवादी कारवायात वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील आसिफ फकिरा पठाण, कय्युम युसूफ पठाण व शेख जाहिर शेख गयास यांची चौकशी केली. हे तिघेही सिमी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सिमी संघटनेची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.