पुणे विद्यापीठ नियुक्त स्थानिक चौकशी समितीने भाऊसाहेबनगर येथील क. का. वाघ महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थी संख्या, शैक्षणिक गुणवत्ता, अद्ययावत रसायनशास्त्र प्रयोगशाळा, भूगोल प्रयोगशाळा यांची पाहणी केली.
समितीचे अध्यक्ष भेंडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जे. अप्पाराव होते. त्यांच्या समवेत अहमदनगर येथील प्रा. डॉ. व्ही. के. धस, व्ही. एन. नाईक महाविद्यालयाचे प्रा. दिलीप कुटे, प्रा. संजय काळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अप्पाराव यांनी विद्यार्थीहित लक्षात घेऊन प्राध्यापकांनी अध्यापनाचे कार्य करून आपला विद्यार्थी भविष्यात कसा यशस्वी होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सर्वानी संशोधकवृत्ती वाढवून विद्यार्थ्यांनादेखील संशोधकदृष्टी द्यावी, विद्यापीठ आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून त्यांना लाभ करून द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. बी. एन. वाघ यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.