राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली तेव्हा आपण जाणीवपूर्वक पाटबंधारे खाते घेतले. पाटबंधारे राज्यमंत्री झालो नसतो तर निळवंडे धरण मार्गी लागले नसते, असे स्पष्ट करतानाच या कामी मंत्री मधुकरराव पिचड यांची मोठी मदत झाल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
तालुक्यातील निमज येथे वीरभद्र सहकारी दूध संस्थेचा रौप्यमहोत्सव आणि लोकवर्गणीतून सुमारे ४१ लाख रुपये खर्चून उभारलेल्या हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा थोरात यांच्या हस्ते झाला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे तालुका दूध संघाचे अध्यक्ष आर. बी. राहणे, पंचायत समितीच्या सभापती सुरेखाताई मोरे, उपनगराध्यक्ष विवेक कासार, सरपंच जिजाताई िशदे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यात सहकाराबरोबरच पाणीपुरवठय़ाचेही जाळे निर्माण केले. त्यामुळे तालुक्यात ऊसशेती फुलली आणि दूध धंद्यालाही बरकत आली. सुरुवातीच्या काळात कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण केलेल्या येथील दूध संस्थेने रौप्यमहोत्सव साजरा करावा ही गौरवास्पद बाब आहे. सातत्याने विकासाच्या वाटेवर राहिलेले निमज हे चैतन्यशील गाव आहे. ४१ लाख रुपयांची लोकवर्गणी करून मंदिर उभारणे ही बाबही सोपी नाही.
यापुढे पाण्याचा वापर अधिक काटकसरीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. पिण्याला पाणी कमी होते म्हणून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा पाणी सोडले गेले. आपण औरंगाबादचे पालकमंत्री असलो तरी आपल्या माणसांचीही मला काळजी आहे. त्यामुळेच प्रोफाईल वॉलचा विषय पुढे आणला. मात्र त्याविरोधातही न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयात जाणारे नाव कोणाचेही असले तरी त्यामागे कोण आहे हे लपून राहिले नसल्याचे थोरात यांनी सांगितले.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, संगमनेरकडे बघण्याचा राज्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे आता आपल्याला सामाजिक बदलही करावे लागतील. तालुका कुटुंब मानून आणि सर्वाना सोबत घेऊन येथे काम केले जाते. सहकार आणि अध्यात्माचा सुंदर मिलाफ निमज गावात पाहायला मिळाला. खेमनर, कानवडे, मोरे, विवेक कासार यांचीही या वेळी भाषणे झाली. उपसरपंच विलास कासार यांनी स्वागत केले. तालुका दूध संघाचे संचालक संपतराव डोंगरे यांनी प्रास्ताविक तर शांताराम डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन डोंगरे यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2013 रोजी प्रकाशित
निळवंडेसाठीच ‘त्या’ वेळी पाटबंधारे खाते घेतले
राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली तेव्हा आपण जाणीवपूर्वक पाटबंधारे खाते घेतले. पाटबंधारे राज्यमंत्री झालो नसतो तर निळवंडे धरण मार्गी लागले नसते, असे स्पष्ट करतानाच या कामी मंत्री मधुकरराव पिचड यांची मोठी मदत झाल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
First published on: 03-09-2013 at 01:46 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrigation dept accepted for nilwande dam