भ्रष्टाचारावर पूर्णपणे नियंत्रण आणणे आजतागायत कोणालाच जमलेले नाही. त्यामुळे यापुढेही ते जमेल असे वाटत नसल्याचे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक मुरलीधर खैरनार यांनी मांडले. म्हसरूळ येथील ओम गुरुदेव व्याख्यानमालेत ‘भ्रष्टाचाराचे भूत’ या विषयावर ते बोलत होते.
भ्रष्टाचार हा पूर्वापार चालत आला असून सर्व सरकारचा तो अविभाज्य भाग बनत चालला आहे. भ्रष्टाचार टाळणे जमलेले नाही. ज्या प्रमाणात कायदे व नियम यांची संख्या वाढत जाते त्या प्रमाणात भ्रष्टाचारही वाढत जातो. पैसे दिल्यावर काम पटकन होत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. त्यामुळे आपले काम इतरांपेक्षा लवकर होण्यासाठी नागरिकांकडून संबंधितांना पैसे दिले जातात.
यापुढे भ्रष्टाचार न होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला, मंत्र्याला प्रोत्साहन वेतन दिल्यास कार्यक्षमतेने काम नक्कीच होईल आणि प्रगतीला हातभार लागेल, असे मत खैरनार यांनी मांडले. वक्त्यांचा सत्कार कार्याध्यक्ष केशवराव गायकवाड, माजी नगरसेवक अरुण पवार यांनी केला. या वेळी व्यासपीठावर पंचवटी प्रभाग सभापती शालिनी पवार, नगरसेविका रंजना भानसी, अध्यक्ष ग. तु. सूर्यवंशी आदी उपस्थित होते