गोदावरी नदीपात्रातील जांभूळ बेटावर मागील सहा महिन्यांपासून अडक लेल्या ३९ वानरांना सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील समाधान व संदीप या गिरीबंधूंनी मंगळवारी पिंजऱ्याद्वारे सुखरूप बाहेर काढले. तब्बल सहा महिन्यांनंतर या वानरांची उपासमारीतून सुटका झाली.
पालमजवळील गोळेगाव परिसरात गोदावरीपात्रात प्रसिद्ध जांभूळ बेटावर मागील सहा महिन्यांपूर्वी हा कळप उन्हाळय़ात पाणी नसताना गेला होता. पावसाळय़ातील पाणी व दिग्रस बंधाऱ्यात अडवलेल्या पाण्यामुळे या बेटाच्या चहूबाजूंनी पाणी साठल्यामुळे बेटाबाहेर पडणे त्यांना कठीण झाले. झाडांची पानगळ व बेटावरील फळे संपुष्टात आल्याने वानरांची उपासमार सुरू झाली.
या भागातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत त्यांना अन्नपुरवठा सुरू ठेवला. वानरे बोटीत बसत नसल्याने त्यांना पिंजऱ्याद्वारे बाहेर काढण्यात आले. गिरीबंधूंनी यासाठी विशेष मेहनत घेतली. दोन टप्प्यांत ही वानरे बाहेर काढण्यात आली. या वानरांना पालमजवळील शिवारात सोडण्यात आले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, तहसीलदार आर. आर. प्रत्येकी, वनपरिक्षेत्र अधिकारी मुंडे, वनपाल देवकते, नागरगोजे यांची या वेळी बेटावर उपस्थिती होती.