कराड-तासगाव मार्गावरील शेणोली स्टेशन येथील भरवनाथ ज्वेलरी हे दुकान बंद करून शेरे गावाकडे अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवरून जाणा-या सराफाच्या डोळय़ात मिरचीपूड टाकून एक किलो सोने, सहा किलो चांदी तसेच रोख एक लाख रुपये असा तब्बल ३५ लाख रुपयांचा ऐवज तीन चोरटय़ांनी लुटला. दरम्यान, पोलीस तपास ताकदीने जारी असून, कोणासही अटक करण्यात आली नसल्याचे कराड ग्रामीण पोलिसांनी सांगितले. तपासकामी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस पथक रवाना झाली आहेत. मात्र, तपासातील नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
सचिन शंकर हाके (वय २६, मुळ रा. संभाजीनगर-अटपाडी जि. सांगली) व त्यांचे वडील शंकर हाके हे दुकान बंद केल्यानंतर वरील ऐवज बॅगमधून घेऊन शेरे गावाकडे निघाले होते. यावेळी शेरे हद्दीतील कॅनॉलजवळ पाठीमागून तिघेजण एका मोटारसायकलवरून आले. त्यांनी हाक मारून दुचाकी थांबवली. लगेचच शंकर हाके यांच्या कॉलरला पकडून ओढल्याने त्यांची गाडी रस्त्यावर पडली आणि हीच संधी साधून अज्ञात तीन चोरटय़ांनी हाके पिता, पुत्रांना चाकूचा धाक दाखवत मिरचीपूड डोळय़ात फेकली व दागिने व रोख रक्कम असा ३५ लाखांचा ऐवज असलेली बॅग घेऊन तिघांनी शेणोली स्टेशनच्या दिशेने मोटारसायकलवरून पोबारा केला. या खळबळजनक घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिसात झाली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. बी. चौखंडे करीत आहेत.