ग्रामीण भागात प्रथमच मॅटवर कबड्डी स्पर्धा आयोजित करून त्या यशस्वी करण्याचा मान वडणगे(ता.करवीर) येथील जयकिसान तरूण मंडळाने पटकाविला आहे. त्यांनी आयोजित केलेल्या ६० किलोखालील मॅटवरील कबड्डी स्पर्धेत सडोली येथील शाहू क्रीडा मंडळाने विजेतेपद मिळविले. तर, यजमान जयकिसान क्रीडा मंडळास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
वडणगे येथील जयकिसान क्रीडा मंडळ ही जुनी नामांकित क्रीडा संस्था असून या संस्थेचे अनेक खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेतून नावलौकिक मिळवून अनेक शासकीय पदावर कार्यरत आहेत. मराठमोळी रांगडी कबड्डी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाताना मूळचे क्रीडांगणावरचे रूप बदलून मॅटवर खेळली जाऊ लागली. राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून प्रत्येक जिल्हा संघटनेस जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मॅट देण्यात आली. या मॅटचा सराव खेळाडूंना व्हावा व ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेल्या हायटेक कबड्डीचे स्वरूप सर्वाना माहिती व्हावे, या उद्देशाने माजी जिल्हा परिषद सदस्य व या मंडळाचे अध्यक्ष बी.एच.पाटील व सहकाऱ्यांनी गेले दोन दिवस या मॅटवरील कबड्डीचेआयोजन केले.
या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्य़ातून १६ संघांना निमंत्रित करून गटवार साखळीयुक्त व बाद पध्दतीने स्पर्धा घेण्यात आली. बाद फेरी जयकिसान क्रीडामंडळ वडणगे संघाने छावा शिरोली संघावर तर शाहू सडोली संघाने जय मातृभूमी भादोले संघावर मात करून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत सडोली संघाने यजमान वडणगे संघावर ७ गुणांनी विजय मिळवून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.वडणगेचा राहुल जांभळे स्पर्धेतील सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरला. स्पर्धेत प्रथमच देण्यात आलेले ‘उत्कृष्ट प्रशिक्षक पारितोषिक’ कुरूंदवाडचे आब्बास पाथरवट यांना, तर ‘उत्कृष्ट संघ नियंत्रक’म्हणून कुडाळ संघातील राजू पाटील यांना देण्यात आले.