कर्जत येथे आज पुरातन दत्त मंदिरात उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली. सन १८२७ साली येथील भणगे कुटुंबियांनी येथे दत्त मंदिराची स्थापना केली होती. आज त्याला १८५ वर्षे पूर्ण झाली. जिर्णोध्दार करण्यात आलेल्या या मंदिराची दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला वास्तूशांती झाली.
या संदर्भात भणगे वंशातील गोविंद भणगे यांनी या मंदिराची व मूर्तीची महती सांगितली. (कै.) विठ्ठलराव भणगे यांनी राज्यात अतिदुर्मिळ असणाऱ्या दत्त मंदिरांपैकी एक मंदिर कर्जत येथे भणगे गल्लीत सन १८२७ साली बांधले आहे. या मंदिरातील मूर्ती राजस्थान येथील मकराना येथून आणण्यात आली आहे. मूर्ती आणण्यासाठी विठ्ठलराव बैलगाडीने काही सहकाऱ्यांबरोबर गेले होते. येताना मात्र ते पायी आले व त्यांनी ही मूर्ती सोवळ्यात झोळीत आणली. अतिशय सुंदर, देखणी व प्रसन्न अशी ही मूर्ती आहे. राज्यात दत्त संप्रदायात प्रसिद्ध असणारे दत्त महाराज कवीतकर हे तीन वेळा या ठिकाणी दर्शनासाठी आले होते. त्यांनी स्वत: या मूर्तीला अभिषेक केला असून एवढी सुंदर व वेगळी मूर्ती इतरत्र आढळत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या मंदिरात पूर्वी भजन, कीर्तन असे नियमित कार्यक्रम होत असत. या मंदिराचा गोविंद भणगे यांनी नुकताच जीर्णोद्धार केला आहे. मंदिराचा मूळ गाभा तोच ठेवताना भिंती मजबूत केल्या आहेत. यासाठी गोविंद भणगे, संतोष कुलकर्णी, दिपांजली पेडगावकर, मृनाली संतोष चिकटे व विठ्ठलराव राऊत, सतीश पवार व ओंकार तोटे यांनी अर्थसाहाय्य केले.
काल या मंदिरात वास्तूशांतीचा कार्यक्रम झाला. दत्तजयंतीनिमित्त महिलांचा भजनी सप्ताह कार्यक्रम झाला. शिवाय गुरूचरित्राचे पारायण करण्यात आले. आज सकाळी विधीवत पूजा करून सायंकाळी दत्त जन्माचा कार्यक्रम झाला.