राज्यभर गाजलेल्या कर्जत चारा घोटाळा प्रकरणाची सीआयडी चौकशी सध्या सुरू आहे. परंतु या घोटाळ्यास जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभागादेखील तेवढाच जबाबदार असून जि. प. त्याबाबत अद्याप गप्प का, असा सवाल भाजप जिल्हा आघाडीचे अध्यक्ष अनिल शर्मा यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील एकनाथ पाटील संस्थेने चारा वाटपात केलेला गैरव्यवहार महसूल विभागाच्या कागदपत्रांवरून सिध्द झाला. नागपूर अधिवेशनात यावर चर्चा होऊन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सीआयडीद्वारे चौकशीचे आदेश दिले. त्यावरून तपासही सुरू आहे. याप्रकरणी कर्जतच्या तहसीलदारांची बदलीही करण्यात आली आहे. मात्र, एवढा सगळा प्रकार होताना जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभागही यास जबाबदार असताना गप्प कसा? कारण जनावरांची आकडेवारी या विभागातूनच दिली जाते. शिवाय शेतकऱ्याला चारा वाटपासाठी दिलेल्या पिवळ्या कार्डवर पशुधन विकास अधिकाऱ्यांची  सही असते. बारडगाव येथील सर्व कार्डवर पशुधन विकास अधिकाऱ्याच्या अशा सह्य़ा आहेत. ही सर्व बोगसगिरी चालू असताना त्यांनी सह्य़ा केल्या नसत्या तर पुढील गैरव्यवहार झालाच नसता. परंतु या गैरव्यवहारात पशुसंवर्धन विभागाचा अधिकारी सहभागी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने संबंधितावर कारवाई करणे गरजेचे आहे, असे शर्मा यांनी निवेदनात म्हटले आहे.