येरवडा  कारागृहातील  पाचजणांची महत्त्वपूर्ण भूमिका
तयारीत सहभाग असतानाही तिघांना  शेवटपर्यंत कसाबविषयी नव्हती माहिती
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्याच्या प्रक्रियेत कारागृहातील दोन अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. या पाचपैकी केवळ दोघांनाच कसाबला फाशी द्यायची असल्याचे माहिती होते. त्याच दोन व्यक्ती कसाबला प्रत्यक्षात फाशी देण्याच्या वेळी उपस्थित होत्या. इतर तिघांचा या प्रक्रियेत समावेश असला तरी फाशी जाणारा संबंधित गुन्हेगार हा कसाब असल्याचे त्यांना शेवटपर्यंत माहीत नव्हते, अशी माहिती येरवडा कारागृहातील सूत्रांनी
दिली.
ऑर्थर रोड कारागृहातून सोमवारी रात्री दीडच्या सुमारास मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक कसाबला येरवडा कारागृहात घेऊन आले. बुधवारी सकाळी साडेसात वाजता त्याला फाशी देण्यात आली. कसाबच्या फाशीचा खटका ओढणारी व्यक्ती ही कारागृहातील अधिकारीच होती. याबाबत राज्याच्या कारागृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, येरवडा कारागृहातच कसाबला फाशी देण्यात येणार असल्याचे आदेश कारागृह अधीक्षकांना आले होते. त्यामुळे फाशी देण्यापूर्वी तीन दिवसांपासून कसाबला फाशी देण्याची तयारी सुरू होती. या फाशीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. कसाबला फाशी देण्याच्या तयारीत दोन अधिकारी व तीन कर्मचारी होते. त्यातील तिघांना कोणाला फाशी द्यायची हे शेवटपर्यंत माहिती नव्हते. या फाशीची माहिती  या कर्मचाऱ्यांना झाल्यास कारागृहातील इतर कर्मचाऱ्यांना ही माहिती होऊन ती बाहेर फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे खूपच गुप्तता बाळगण्यात आली होती. या प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी फाशीचा दोर तुपात भिजवण्याचे काम केले. अगोदरच्या दिवशी कसाबच्या वजनापेक्षा जास्त वजन घेऊन दोराची चाचणी घेतली होती. शेवटपर्यंत त्यांना कसाबला फाशी देण्यात येणार असल्याचे माहिती नव्हते.
याबाबत कारागृहाच्या निवृत्त अधिकाऱ्याने सांगितले की, कारागृहात जल्लाद उपलब्ध नसले तर तुरुंग अधिकारी किंवा तुरुंग अधीक्षकच फाशीचा खटका ओढतो. खटका ओढणे हा फाशी देण्याचे शेवटचे काम आहे. त्या अगोदर मोठी प्रक्रिया असते. दोर तुपात ठेवून तो नरम करावा लागतो. फाशी देणाऱ्या व्यक्तीला बाहेरून कोणतीही दुखापत होऊ द्यायची नसते. खटका ओढल्यानंतरची पुढील प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी गुन्हेगाराचे वजन व इतर गोष्टींची अगोदरच चाचणी घेतली जाते.