सोलापुरातील जागृत सुफी संत हजरत पीर अब्दुल रहीमबाबा अन्सारी यांचा ५२ वा ऊर्स शरीफ येत्या ४ जानेवारीपासून चार दिवस साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. दोन दिवस ‘महफिले समा’ (कव्वाली) चालणार असून त्यात अनेक नामवंत कव्वाल मंडळी सहभागी होऊन सेवा रुजू करणार आहेत.
तेलंगी पाच्छा पेठेतील गौसिया मंझिल येथे बाबांच्या दर्गाहमध्ये आयोजित या ऊर्स शरीफच्या पहिल्या दिवशी, ४ जानेवारी रोजी सायंकाळी तेथील अरबी मदरशात कुराण शरीफचे अध्ययन पूर्ण केलेल्या मुलांचा सन्मान केला जाणार आहे. या मदरशात उस्ताद अ. कादर विजापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर मुले-मुली कुराण शरीफचे अध्ययन करीत असून आतापर्यंत ९०० मुला-मुलींनी कुराण शरीफचे अध्ययन केले आहे. यात १५ मुले व ८ मुली ‘अलीम’ झाल्या आहेत.
५ जानेवारी रोजी ‘संदल’चा कार्यक्रम होणार असून रात्री आठ वाजता दर्गाहमधून ‘संदल’सह शोभायात्रा निघणार आहे. नंतर रात्री उशिरा बाबांच्या पवित्र समाधीला संदलचे लेपन तथा गलफ व चादर अर्पण केल्यानंतर फातेहाखानीचा विधी संपन्न होणार आहे. नंतर लागोपाठ ‘महफिले समा’ होणार आहे. यात बाबांचे दिवंगत शिष्य तथा विख्यात कव्वाल मास्टर हबीब निझामी यांचे पट्टशिष्य अयुब निझामी, मेहमूद निझामी, शाहीद अजमेरी (नगर), हाशम निझामी (पुणे), अ. सत्तार निझामी (सोलापूर) तसेच मुन्ना-मोईन कव्वाल (सोलापूर) ही कव्वाल मंडळी सहभागी होऊन ऊर्स शरीफची परंपरा चालविणार आहेत. याशिवाय दुसऱ्या दिवशीही, ६ जानेवारी रोजी ‘चिरागा’च्या (दीपोत्सव) मुख्य सोहळ्यातही ही कव्वाल मंडळींची ‘महफिले समा’ रंगणार आहे. तत्पूर्वी, बाबांच्या समाधीवर गलफ व चादर तथा फुलांचा ‘झेला’ अर्पण केल्यानंतर रात्री नऊ वाजता ऊर्स शरीफमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे. ७ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता जियारतीच्या विधीने ऊर्सची सांगता होणार असल्याचे दर्गाह विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुदस्सर शरफोद्दीन शेख यांनी कळविले आहे. या ऊर्समध्ये सोलापूरसह पुणे, नगर, हुबळी, धारवाड, विजापूर, गुलबर्गा आदी भागातून भाविक उल्लेखनीय हजेरी लावतात, अशी माहितीही मुदस्सर शेख यांनी दिली.