राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शेतीचे पाणी कमी केले तसे जास्त पाणी लागते अशा उद्योगांना पाणी देणे बंद करावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी, तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार विखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. जि. प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे आदी यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, यापुढे कटूता बाजूला ठेऊन एकीचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याचा प्रश्न तर आहेच. परंतु पशूधन वाचविणे गरजेचे असून, जायकवाडीला पाणी देताना आपण भांडलो. आरोप कितीही झाले असले, तरी त्यामुळे हे रोटेशन करुन या भागातील पिके वाचविता आली. दोन महिन्यांनी दुष्काळाची तीव्रता आणखी वाढेल. भंडारदऱ्यातून किमान दोन रोटेशन घेण्याचा आपला विचार असून, नंतर परिस्थिती काय होईल हे सांगू शकत नाही. जानेवारी महिन्यातच राज्यात दोन हजार टँकर सुरु आहेत. जालना शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करावा असा प्रस्ताव आला असून, आजपर्यंत टँकर आणि छावण्यांसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च झाला असल्याने नियोजनाला कट लावूनच दुष्काळाशी मुकाबला करावा लागेल. माजी मंत्री म्हस्के, शालिनीताई विखे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पंडीत लोणारे यांचीही यावेळी भाषणे झाली.