बहुजन आणि कष्टकरी समाजातील लाखो भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र पाली येथील मल्हारी म्हाळसाकांत खंडोबादेवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस वऱ्हाडी मंडळींच्या तोबा गर्दीने उदंड उत्साहात पार पडला. दुपारच्या ठीक अडीच वाजता खंडोबा मंदिरातून देवांच्या मूर्ती बाहेर पडल्या अन् सदानंदाच्या नावाने यळकोट, यळकोटच्या जयघोषात पिवळय़ाधमक भंडाऱ्याच्या उधळणीत सालाबादप्रमाणे गोरज मुहूर्तावर खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. दरम्यान, शिस्तबद्ध नियोजन, देवस्थान कमिटीचे सहकार्य आणि पर्यटन विकासनिधीतून झालेल्या कामामुळे यात्रा सुरळीत पार पडत असल्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यात्रेला तुलनेत भाविकांची हजेरी काहीशी कमीच राहिली. यात्रेची पोलिसांकडून उंच मनोऱ्यावरून टेहाळणी होताना, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे यात्रेवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले होते. अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे व कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या नेतृत्वाखाली कमालीचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
परंपरेनुसार उत्साहात व शांततेत पार पडलेल्या मानाच्या आणि प्रसिद्ध खंडोबाच्या यात्रेला सहा लाखांवर भाविक उपस्थित राहिल्याचा दावा करण्यात आला आहे. आमदार बाळासाहेब पाटील, कराडचे प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुधाकर भोसले यांच्यासह पोलीस, महसूल, आरोग्य तसेच शासकीय खात्यांचे अधिकारी व कर्मचारी जातीने हजर होते. अगदी पहाटेपासून भाविकांनी देवदर्शनासाठी मंदिराबाहेर भल्या मोठय़ा रांगा लावल्या होत्या. प्रत्येकाला दर्शन व्हावे यासाठी देवस्थानने चोख व्यवस्था केली होती. मुख्य दरवाजाच्या परिसरात गर्दी रोखण्यात प्रशासनाला यश आल्याचे दिसून आले.
प्रथेप्रमाणे मुख्य मानकरी देवराज काळभोर-पाटील यांच्या वाडय़ापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ‘यळकोट, यळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाच्या नावानं चांगभलं’ अशा प्रचंड जयघोषात पाल देवस्थानच्या गजराजावर आरूढ झालेले मुख्य मानकरी देवराजदादा पाटील आपल्या पोटाशी खंडोबा व म्हाळसाचे मुखवटे बांधून सहभागी होते, विविध मानाचे गाडे, ट्रॅक्टर्स, घोडे, पालख्या मोठय़ा उत्साहाने मिरवणुकीत सामील होत्या. ही सवाद्य मिरवणूक देवळात प्रवेश केल्यानंतर यथासांग पूजाअर्चा, धूपारती करण्यात आली. देवराजदादा खंडोबा व म्हाळसाचे पोटाशी बांधलेल्या मुखवटय़ासह पुन्हा गजराजावर आरूढ झाले. पुढे मिरवणूक तारळी नदीच्या पात्रातून बोहल्याकडे गेली. तेथे गोरज मुहूर्तावर खंडोबा व म्हाळसा यांचे विधिवत शाही विवाह सोहळा मोठय़ा दिमाखात संपन्न झाला. लाखो श्रद्धाळू भाविकांनी पिवळय़ाधमक भंडाऱ्यासह खोबऱ्याची एकच उधळण करून, वऱ्हाडय़ाची जबाबदारी पार पाडली. रीतिरिवाजाप्रमाणे मिरवणुकीत ठिकठिकाणचे घोडे, मानाच्या पालख्या, गाडे सामील होते. यात्रेत लाठीकाठीला बंदी होती. तर यात्रा परिसरात कमालीचा चोख बंदोबस्त ठेवताना, वरिष्ठ पोलीस अधिकारी यात्रेवर कसोशीने नियंत्रण ठेवून होते.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2014 रोजी प्रकाशित
खंडोबा-म्हाळसाचा विवाह उत्साहात
बहुजन आणि कष्टकरी समाजातील लाखो भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र पाली येथील मल्हारी म्हाळसाकांत खंडोबादेवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस वऱ्हाडी मंडळींच्या तोबा गर्दीने उदंड उत्साहात पार पडला.

First published on: 14-01-2014 at 03:10 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandoba mhalasa marriage in spirit