शहरातील पतंग प्रेमींचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी ‘वाऱ्याच्या विरोधात संघर्षांतूनही जिद्दीने भरारी घ्या’ असा संदेश देत येथील ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी दुपारी दोन वाजता अनंत कान्हेरे मैदानावर ‘पतंग महोत्सव २०१२’ चे आयोजन करण्यात आले आहे. येवला येथील पारंपरिक पतंग व पतंगबाज या महोत्सवाचे खास आकर्षण राहणार असून उपस्थितांना जगातील सर्वात मोठी पतंग व सर्वात लहान पतंग या ठिकाणी पहावयास मिळणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी दिली. याशिवाय ‘एरोनॉटिकल शो’ चेही याठिकाणी आयोजन करण्यात येणार असून त्यानिमित्त बच्चे कंपनीला रिमोटवरील लहान विमाने, हेलिकॉप्टर हवेत विहरताना पाहावयास मिळणार आहेत.
वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसाठी ऊर्जा प्रतिष्ठानचा लौकिक आहे. नाशिक शहर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे, या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने तीन वर्षांत विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. पतंग आणि नाशिक जिल्ह्यातील येवला यांचा अतूट संबध आहे. येवला येथे संक्रांतीच्या दिवशी तर दीपावलीप्रमाणे उत्सवी वातावरण असते.
मैदानावर, गच्ची, छत, जिथे जागा मिळेल तिथे पतंग उडविणाऱ्यांची धूम असते. येवल्यातील या पतंग उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात येवला येथील पारंपरिका पतंगींसह तेथील पतंगबाज सहभागी होणार आहेत.
यावेळी पतंगबाजांची आसारीवर होणाऱ्या खास काटाकाटी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. या महोत्सवात ‘गई बोला ना’ च्या आवाजाला ‘हलकडी’ ची साथ लाभणार आहे. महोत्सवात अहमदाबाद येथील दीप काइट क्लब, गोपाल पटेल एम.एच. काइट क्लब, मुंबई येथील गोल्डन काइट क्लब, बडोदा येथील क्लब, रॉयल क्लब सहभागी होणार आहेत. गुजरातमधील पारंपरिक पतंगबाजांचे कौशल्यही या वेळी नाशिककरांना अनुभवयास मिळणार आहे. एकाच वेळी एकाच दोऱ्याच्या सहाय्याने १०० पतंग कशा उडविल्या जातात, हेही यावेळी पाहावयास मिळेल.
पतंग महोत्सवासह या ठिकाणी विशेष एरोनॉटिकल शो ही होणार आहे. या मध्ये रिमोटवर हवेत विहरणाऱ्या लहान विमान तसेच हेलिकॉप्टरची मजा बच्चे कंपनींना घेता येईल. या दोन्ही कार्यक्रमांसाठी नाशिककरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अजय बोरस्ते यांनी केले आहे. महोत्सव यशस्वीतेसाठी प्रफुल्ल पारख, संतोष कहार, संजय घोडके, निनाद शहा, पंकज पाठक आदी प्रयत्नशील आहेत.