कोकणच्या विकासाला हातभार लावावा या उद्देशाने ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’च्या वतीने येत्या २ आणि ३ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे भव्य अशा ‘कोकण विकास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कोकणातील पायाभूत सुविधांविषयी वेगवेगळ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून नवी मुंबईतील नियोजित विमानतळ, कोकणातील रस्त्यांचे चौपदीकरण या प्रकल्पांचे सादरीकरणही या परिषदेत केले जाणार आहे. कोकण पर्यटन विकासासाठी शासकीय विभागांचा समन्वय साधता यावा यासाठी कोकणातील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांचे एक समन्वय चर्चासत्रही या दोन दिवसीय परिषदेत आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी कोकणाशी संबधित सर्व क्षेत्रातील व्यक्ती एकाच छताखाली येणार आहेत. रविवार २ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते परिषदेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यानंतर कृषी क्षेत्रातील गुतवणुकीच्या संधी, फळ प्रक्रिया उद्योग, पर्यटन क्षेत्र, कला क्षेत्र यासंबंधी डॉ. आनंद तेंडूलकर, संजय यादवराव, संदीप सावंत यांचे व्याख्यान होणार आहे.
दुपारच्या सत्रात कोकणातील पायाभूत सुविधांच्या विकासासंबंधी सविस्तर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड पटय़ात उभे राहणाऱ्या महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्र , शिवडी न्हावा सागरी सेतू, नवी मुंबई आंतरराष्टीय विमानतळ यासारख्या मोठय़ा प्रकल्पांचे सादरीकरण या परिषदेत केले जाईल अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार तसेच कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकणातील बंदरांचा विकास तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी याविषयावरही परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  तसेच सोमवार ३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी कोकणचा पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. सकाळच्या सत्रात कोकणच्या पर्यटनावर आधारित लघुचित्रफितीचे अनावरण केले जाणार आहे. तसेच सागरीजैवसंशोधक डॉ. सारंग कुलकर्णी आणि संजय यादवराव कोकणच्या विविध पर्यटन स्थळांविषयी माहिती देणारे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. यानंतर कोकणशी संबंधित विविध क्षेत्रातील व्यक्ती येथील पर्यटन प्रकल्पांची माहिती देणार आहेत. कोकणचा कृषी विकास, पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन, मत्स्य तसेच दुग्ध आणि कुक्कुटव्यवसाय यासारखे विविध विषयही यावेळी चर्चिले जाणार आहेत. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यावेळी मार्गदर्शन करतील.