मखमलाबाद सार्वजनिक वाचनालय व नारायणराव मानकर प्रतिष्ठान आणि अर्चित फिल्म यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘क्रांतिज्योती ग्रामज्योती’ पुरस्काराचे वितरण शांतिनिकेतन पटांगणावर उद्या, गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभाग सहाचे नगरसेवक दामोदर मानकर यांनी दिली.
पुरस्काराचे हे चौथे वर्षे असून, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत शैक्षणिक तसेच विविध कला प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा या वेळी क्रांतिज्योती पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यास आ. अ‍ॅड. उत्तम ढिकले व रामकृष्ण वारकरी शिक्षण अध्यात्म आश्रमचे हसन महाराज अत्तार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आ. जयंत जाधव, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार उपस्थित राहणार आहेत. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वेदिका काकड, श्वेता विसपुते, मनीषा साबळे, गायत्री पिंगळे, शरयू रसाळ, निकिता दौंड, शीतल सूर्यवंशी, निकिता पवार, मनीषा फडोळ, ज्ञानेश्वरी काकड, सोनाली मोरे, रुपाली मानकर, रत्ना काकड, प्रांजल मुळाणे, पल्लवी धात्रक आणि अश्विनी पिंगळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर समीर भुजबळ यांच्या खासदार निधीतून वाचनालयाच्या पटांगणात २० लाख रुपये खर्च करून सभा मंडप बांधण्यात येणार आहे. या सभा मंडप भूमिपूजनाचा कार्यक्रम आ. जयंत जाधव यांच्या हस्ते होणार आहे.
पुरस्कार सोहळा व भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मानकर यांनी केले आहे.