शहरातील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त आदिवासी पाडय़ावर खाऊ व कपडे वाटप केले जातात. यंदा या उपक्रमाने १२ वर्षे पूर्ण केली असून त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यातील पाडय़ांवर वाटप करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या आदिवासी कार्य समितीच्या अंतर्गत कविवर्य कुसुमाग्रज यांनी भेट दिलेल्या पाडय़ांवर जे नाते ऋणानुबंध करून ठेवले. त्याचा प्रतिसाद या उपक्रमाच्या वेळी आढळून आल्याचे प्रतिष्ठानने म्हटले आहे. प्रतिष्ठानची गाडी पाडय़ावर प्रवेश करताच लहान मुले, महिला व पुरुष एकत्र येऊन शिस्तीने रांगा लावून त्यांच्या भाषेतील गाणे ऐकवीत खाऊ व कपडय़ांचा स्वीकार करत होती, तर अंगणवाडी शिक्षकांना ‘साधना’ बालदिवाळी अंकाचे वाटप करण्यात आले. डॉ. यशवंत बर्वे यांच्या नेतृत्वाखाली मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डॉ. विजय सिर्सिकर, अविनाश भामरे, सोमनाथ काळे, सिम्बॉयसीस महाविद्यालयाचे प्रसाद वाझट आदींसह आदिवासी कार्यकर्त्यांनी त्र्यंबक व पेठ तालुक्यातील अंबई, तोरंगण, बोंबिलटेक कमळीचा पाडा, गणेशगाव (वाघेरा), विजयनगर, हिरडी, गोविंदनगर, राजेवाड, भोकरवाडी अशा ११ पाडय़ांवर खाऊ व कपडय़ांचे वाटप केले.