अनैतिक संबंधातून महिलेला पेटविण्याचा प्रकार रावेर तालुक्यातील सिंगनूर येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारात महिलेचा मृत्यू झाला असून संशयितानेही पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृतीही गंभीर आहे. या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सिंगनूर येथे शिला दलपत तायडे (३५) ही विवाहिता आठ वर्षांच्या मुलासह विभक्त राहात होती. तांदलवाडी येथील सुनील तायडे हा शिला यांच्या घरी वारंवार येत असे. तीन दिवसांपूर्वी त्याचे शिलाशी कडाक्याचे भांडण झाले.
संतापात त्याने शिलाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यानंतर स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. या घटनेत शिलाचा जागीच मृत्यू झाला तर संशयित सुनील तायडे गंभीररीत्या भाजला गेला. मयत शिलाचा आठ वर्षीय मुलगा घटनेचा साक्षीदार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तायडेशी तिचे अनैतिक संबंध असावेत असा पोलिसांचा संशय आहे.