आप्तस्वकीयांची खुशाली कळविण्यासाठीचा पत्रसंदेश उन्हातान्हात, मुसळधार पावसात घरोघरी घेऊन जाणाऱ्या पोस्टमनला गेली चार वर्षे खाकी गणवेशासाठी झगडावे लागत आहे. २३ जुलै रोजी राज्यातील सर्व पोस्ट कार्यालयांसमोर तसेच कोल्हापूर जिल्हय़ातील पोस्ट कार्यालयांसमोर पोस्टमन छत्री, चप्पल व गणवेश मिळावा यासाठी आंदोलन करणार आहेत.
टपाल खात्याचा राजदूत समजल्या जाणाऱ्या पोस्टमनला दरवर्षी एक खाकी गणवेश, चपला व छत्री शासनातर्फे दिली जाते. मात्र गेली चार वर्षे यापैकी कोणतीही वस्तू राज्यातील पोस्टमनला मिळालेली नाही. पोस्ट खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबत वारंवार टाळाटाळ केली जात असून ब्रिटिश नियमांच्या कात्रीत हा सर्व सोपस्कार अडकला आहे.
पोस्टमनला दिल्या जाणाऱ्या गणवेशात ३३ टक्के व ६७ टक्के पॉलिस्टरचा समावेश असावा. तसेच कमळाच्या फुलाचा आकार असणाऱ्या जाडजूड काडय़ांपासून बनविलेल्या छत्र्या देण्याचा ब्रिटिशकालीन नियम आहे. आजही त्याच नियमाने पोस्टाचा कारभार चालतो. या वर्षी कोल्हापूर विभागात गणवेशासाठी कापडाचा कोटा प्राप्त झाला आहे. पोस्टमन कर्मचाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली असूनही केवळ तांत्रिक मुद्यावर टपाल प्रशासनाकडून कापड परत पाठविण्याचा आदेश आला आहे. या आदेशाचा निषेध म्हणून मंगळवारी नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइजच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने जिल्हय़ातील अडीचशेहून अधिक पोस्टमन ‘चड्डी-बनियन’ आंदोलन करणार आहेत. हेड पोस्ट, कोल्हापूर प्रधान डाकघर, शिवाजी पेठ, गांधी मैदान या ठिकाणच्या पोस्ट कार्यालयांसमोर हे आंदोलन होणार असल्याचे युनियनचे सचिव निसार मुजावर, व्ही. के.पाटील यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jul 2013 रोजी प्रकाशित
चार वर्षे पोस्टमन झगडतायत खाकी गणवेशासाठी
आप्तस्वकीयांची खुशाली कळविण्यासाठीचा पत्रसंदेश उन्हातान्हात, मुसळधार पावसात घरोघरी घेऊन जाणाऱ्या पोस्टमनला गेली चार वर्षे खाकी गणवेशासाठी झगडावे लागत आहे.

First published on: 22-07-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last 4 years postman struggling for uniform