करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील समस्यांचे गाऱ्हाणे मांडायला गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी गनिमा कावा करीत मंदिरातील सुरक्षा व्यवस्था किती तकलादू आहे, हे दाखवून देतांना चक्क मंदिरात रिव्हॉल्व्हर उंचावून दाखविले. यामुळे मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.    
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिरातील समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालल्या आहेत. भक्तांना निवारा, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी या साध्यासुध्या सुविधाही मिळत नाहीत. दुसरीकडेअतिक्रमण व भिकाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. या संदर्भात शिवसेनेने यापूर्वीही तक्रारी केलेल्या होत्या.मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने सोमवारी अभिनव आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक महालक्ष्मी मंदिरात आले. त्यांनी प्रथम महालक्ष्मी मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर मंदिरात जाऊन देवीला साकडे घातले. ‘माते, तुझ्या मंदिरातील समस्या सुटू देत आणि पदाधिकाऱ्यांना ते सोडविण्याची सुबुध्दी मिळू दे,’ असे साकडे त्यांनी घातले.    यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सहायक सचिव शिवाजी साळवी यांच्याशी मंदिरातील समस्येविषयी चर्चा केली. भाविकांना निवारा, स्वच्छतागृहाच्या किमान सुविधाही मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्वच्छतागृहांची सुविधा मोफत मिळणे आवश्यक असतांना त्यासाठी पाच ते दहा रूपये आकारून भाविकांना लुबाडले जात आहे. मंदिरात मिळणाऱ्या सोयीसुविधा, पूजाविधी, त्याचे दरपत्रक निश्चित नसल्याने त्याचा जाब विचारण्यात आला. मंदिराच्या परिसरात अतिक्रमणे वाढत चालली आहेत. जागोजागी चप्पल स्टँड उभारल्याने मंदिराची शोभा निघून चालली आहे. भिकाऱ्यांमुळे भाविक वैतागलेले आहेत, याकडेही लक्ष वेधण्यात आले. या साऱ्या प्रकारामुळे मंदिराची बदनामी होत चालली असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले.     
या आंदोलनावेळी महालक्ष्मी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था किती तकलादू आहे, याचा प्रत्ययही शिवसैनिकांनी आणून दिला. मंदिरामध्ये प्रवेश करतांना मेटल डिटेक्टरमधून आत प्रवेश करावा लागतो. मात्र तो नादुरूस्त असल्याचे आणि सुरक्षा व्यवस्था डोळेझाक करीत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मंदिरात प्रवेश केल्यावर दोन रिव्हॉल्व्हर काढून उंचावून दाखविल्या. महालक्ष्मी मंदिराला अतिरेक्यांकडून धोका असल्याचे स्पष्ट होऊनही त्याकडे कसा कानाडोळा केला जातो, हेच दाखवून देत संजय पवार यांनी याविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या. आंदोलनात महिला आघाडी अध्यक्षा शुभांगी साळोखे, सुषमा चव्हाण,हर्षल सुर्वे, अजिंक्य चव्हाण, बाजीराव पाटील, शिवाजी पाटील, तानाजी आंग्रे, नगरसेवक राजू हुंबे,संभाजी जाधव यांच्यासह शिवसैनिकांचा समावेश होता.