शहरात आज सायंकाळी लक्ष्मीपुजन पारंपारिक पद्धतीने साजरे करण्यात आले. दिपोत्सवाच्या या पुजेने अवघे शहर प्रकाश आणि फटाक्यांच्या लखलखटाने रात्री उजळुन गेले होते. नगरकर एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षांव करत आनंदोत्सवात सहभागी झाले होते. व्यावसायिकांच्या दालनांतही थाटात लक्ष्मीपुजन करण्यात आले. त्यासाठी सजावटीही करण्यात आल्या होत्या. मात्र ऐन सायंकाळच्या वेळी महावितरणने काही भागात थोडा वेळ का होईना वीज कपात करुन या उत्सवाचा हिरमोड करण्याच्या प्रयत्नांची परंपराही कायम ठेवली.
दिवाळीची सुरुवात दोन दिवसांपुर्वीच्या वसुबारसेने झाली असली तरी खऱ्या अर्थाने दिपोत्सवास आज सुरुवात झाली. आनंदोल्हासाचे वातावरण आता पुढिल दोन दिवस पाडवा व भाऊबिजेच्या निमित्ताने कायम राहील. बाजारपेठाही उत्सवी खरेदीने बहारुन गेल्या आहेत. महावितरण प्रमाणेच मोबाईल कंपन्यांनीही स्वत:च्या फायद्यासाठी नागरीकांच्या उत्सवी शुभेच्छांना मोडता घालण्याचा प्रयत्न केला. मोबाईल कंपन्यांनी पॅकेजमधील सवलतीच्या दरातील व मोफत ‘एसएमएस’ची सुविधा अचानक बंद करुन काल व आज असे दोन दिवस एसएमएससाठी दर लागू केले. वर्षभरासाठी पॅकेज घेतलेल्या ग्राहकांची ही एक प्रकारे लुटच ठरली.
अबालवृद्धांनी अभ्यंगस्नान करुन फराळाचा अस्वादही घेतला. शहरातील माळीवाडा, चितळे रस्ता, दिल्लीगेट सर्जेपुरा या प्रमुख रस्त्यावर लक्ष्मीपुजनासाठी लागणाऱ्या लक्ष्मी मुर्ती, केरसुणी, लाह्य़ा, बत्तासे, विडय़ाची पाने, फळांचा वाटा या साहित्याची विक्री करणाऱ्यांनी पथारी मांडली होती. पुजेचा मुहुर्त सायंकाळी ५.५८ ते ८.३८ असा होता. या दरम्यान नवे कपडे परिधान करुन घराघरातुन सहकुटुंब पुजा करण्यात आली, व्यापारी पेठांवरही गल्ला, वह्य़ा, चोपडय़ा, दागिने, पैशांची पुजा करण्यात आली. पुजेनंतर शहर आकर्षक, रंगांची उधळण करणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीने उजळुन केले होते. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxmi pujan with diwali firecrakers
First published on: 14-11-2012 at 03:11 IST