‘‘देशात बेरोजगारांची संख्या ६५ टक्क्य़ांहून जास्त आहे. दुसरीकडे उद्योगक्षेत्राला मोठय़ा प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत ‘शिका व कमवा’ तत्त्वावर राबविल्या जाणाऱ्या योजना विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळवून देऊ शकतील,’’ असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी नोकरी महोत्सवाचे शनिवारी झा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महोत्सवानंतर झा यांनी विशेष कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला. यशस्वी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘शिका व कमवा’ या योजनेसाठी पक्षाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांला नोकरी करता-करता यांत्रिक अभियांत्रिकीची पदविका मिळवून देणारे शिक्षण विनामूल्य घेता येते. त्यात १२५ कंपन्या सहभागी झाल्या असून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यांपैकी बाराशे विद्यार्थ्यांची ‘शिका व कमवा’ योजनेसाठी प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वानुसार काम करणार असल्याचे सांगून, अशा प्रकारचे नोकरी महोत्सव देशभरात राबविण्याची गरज असल्याचे झा यांनी सांगितले.
खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष संदीप बालवडकर, महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, ‘यशस्वी’चे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, संचालक प्रदीप तुपे महोत्सवाच्या उद्घाटनास उपस्थित होते.