चांदवड येथील कोंबडेवाडी परिसरातील विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला अप्रशिक्षित कर्मचारी आणि आवश्यक साहित्याच्या अभावामुळे जीव गमवावा लागल्याचा आरोप करत या मृत्यूची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे नाशिकच्या मुख्य वन संरक्षकांकडे करण्यात आली आहे.
कोणत्याही वन्य प्राण्याला विहिरीत भूल न देण्याचे मार्गदर्शक तत्त्व असतानादेखील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियम धाब्यावर ठेवून केलेली कार्यवाही संशयास्पद असल्याचे क्लबने म्हटले आहे. चांदवड येथील बिबटय़ा हा केवळ वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे दगावला असून वर्षभरात पाच बिबटय़ांचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील ननाशी वन क्षेत्रात तर बिबटय़ाला वन विभागाने नियोजन नसल्याने नागरिकांकडून तो मारला गेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली आहे.
वन्य प्राण्यांना त्वरित वाचविता येण्यासाठी वन विभागाने पाच वर्षांपूर्वी अद्ययावत साहित्याने परिपूर्ण व्हॅनदेखील घेतली आहे. परंतु या व्हॅनचा कोणताही उपयोग होताना दिसत नसून वाहनाला चालक नसल्याच्या कारणामुळे ती धूळ खात पडून आहे. चांदवड येथील बिबटय़ाची सुटका करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज होती. तसेच भुलीचे इंजेक्शन दिल्यावर बिबटय़ा खाली पडला तर पाण्यात जाळी टाकणे अपेक्षित असताना असे न केल्यामुळे बिबटय़ाला जीव गमवावा लागल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शीसमोर भुलीचे इंजेक्शन दिले असताना आम्ही ते दिलेच नाही असे म्हणणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कार्यवाही होणे आवश्यक असून नाशिकमध्ये जखमी प्राण्यांसाठी ‘रेस्क्यू सेंटर’ असावे, अशी मागणीही पर्यावरणप्रेमी सतत करत असताना त्याचादेखील विचार वन विभागाने केलेला नाही. बिबटय़ाच्या मृत्यूची त्वरीत चौकशी न केल्यास संस्थेचे कार्यकर्ते कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. विभागीय वन अधिकारी डी. डब्ल्यू. पगार यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, रमेश वैद्य, प्रमिला पाटील, रूपाली जोशी आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard death interrogation
First published on: 18-03-2015 at 07:46 IST