एका सहा वर्षीय मुलीसह दोघांचे बळी घेणाऱ्या अडीच वर्षीय नरभक्षक मादी बिबटय़ाला आज पहाटे ५.३० वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामागे टॉवर टेकडी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविकास महामंडळाला यश आले. त्यांमुळे टॉवर टेकडी परिसरातील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या बिबटय़ाला मोहुर्लीच्या प्राणी बचाव केंद्रात ठेवण्यात आले असून तेथेच त्याला शुक्रवारी रेडिओ कॉलर लावण्यात येणार आहे.
चंद्रपूर-बल्लारपूर बायपासवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामागे टॉवर टेकडी परिसरात बिबटय़ाने धुमाकूळ घातला होता. ७ डिसेंबरला या मादी बिबटय़ाने अर्चना अमोद तितरे या ३० वर्षीय महिलेला, तर २० डिसेंबरच्या मध्यरात्री बिबटय़ाने टॉवर टेकडी परिसरातील झोपडीत प्रवेश करून निद्रावस्थेतील सविता अवराटे या सहा वर्षीय बालिकेला जुनोनाच्या जंगलात नेऊन ठार केले. अवघ्या पंधरा दिवसात बिबटय़ाने एका बालिकेसह दोघांचे बळी घेतल्याने खळबळ उडाली होती. संतप्त लोकांनी पिंजरे लावून बिबटय़ाला जेरबंद करण्याची मागणी लावून धरली. त्याचा परिणाम वनविकास महामंडळाने टॉवर टेकडी येथे तीन पिंजरे लावले. बिबटय़ाला आमिष देण्यासाठी म्हणून या प्रत्येक पिंजऱ्यात बकरे बांधण्यात आले. काल मंगळवारी मध्यरात्री बिबट पिंजऱ्याजवळ आला आणि त्याने बकऱ्याची शिकार केली. मात्र, त्यानंतर बिबट तेथून निघून गेला. यानंतर आज पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास बिबट दुसऱ्या पिंजऱ्याजवळ बकऱ्याची शिकार करण्यासाठी आला. मात्र, यावेळी बिबटय़ाचा डाव फसला आणि अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाला. पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास परिसरातील लोकांना बिबट जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जीआरके राव, डिव्हिजनल मॅनेजर के.एफ.डोंगरे, सहा. व्यवस्थापक बोट्टवार, वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेके, आत्राम, आमटे घटनास्थळी दाखल झाले. जेरबंद बिबटय़ाची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच हजारो लोकांनी गर्दी केली. या गर्दीतून बिबटय़ाचा पिंजरा ट्रॅक्टरवर ठेवून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहुर्ली येथील प्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले. तेथे बिबटय़ाला ठेवण्यात आले आहे. हा मादी बिबट हा अडीच वर्षांचा असून कित्येक दिवसापासून याच परिसरात भटकत होता, अशी माहिती वनविकास महामंडळाचे डोंगरे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. दरम्यान, या बिबटय़ाची डॉ. कडूकर, डॉ.खोब्रागडे, डॉ.अलोणे यांनी वैद्यकीय तपासणी केली. सध्या बिबटय़ाची प्रकृती चांगली आहे. येत्या शुक्रवारी या बिबटय़ाला रेडिओ कॉलर लावण्यात येणार असल्याची माहिती डोंगरे यांनी दिली. रेडिओ कॉलर लावून या बिबटय़ाला तेथेच काही दिवसासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्याला जंगलात सोडायचे की इतरत्र ठेवायचे, हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सहा बिबट पिंजऱ्यात जेरबंद
या जिल्ह्य़ात एकूण सहा बिबट वनखात्याने जेरबंद करून पिंजऱ्यात ठेवले आहेत. यातील तीन बिबट मोहुर्ली प्राणी बचाव केंद्रात आहे. यातील दोन बिबट यापूर्वीच मोहुर्ली येथे ठेवण्यात आले होते. आता आज या मादी बिबटय़ाला पुन्हा तेथेच ठेवण्यात आले आहे, तर रामबाग नर्सरी येथे एक बिबट जेरबंद पिंजऱ्यात बंद आहे. या बिबटय़ाला माना टेकडी येथे जेरबंद करण्यात आले होते. या बिबटय़ाचे रेडिओ कॉलर काढून ठेवण्यात आले आहे, तर ब्रम्हपुरी वन विभागाच्या कार्यालयात दोन बिबट जेरबंद ठेवण्यात आले आहेत. एकूण सहा बिबटे जेरबंद आहेत. या सहाही बिबटय़ांना जंगलात सोडायचे की जेरबंदच ठेवायचे, हा निर्णय अजून वनखात्याने घेतलेला नाही.