भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे (एलआयसी) नव्या वर्षांसाठी फ्लेक्सी प्लस आणि न्यू जीवन निधी अशा दोन विमा योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. फ्लेक्सिप्लस ही योजना शेअर बाजाराशी निगडित आहे, तर दुसऱ्या योजनेचे स्वरूप पेन्शन योजना असे असल्याची माहिती एलआयसीच्या पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक ए. पी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
योजनेबाबत माहिती देताना कुलकर्णी म्हणाले की, दोन्ही योजना देशभरात लागू झाल्या आहेत. फ्लेक्सी प्लस ही योजना १८ ते ५० वयोगटातील विमाधारकांसाठी उपलब्ध असून तिचे स्वरूप युनिट लिंक्ड म्हणजे शेअर बाजाराशी निगडित आहे. या योजनेत वार्षिक, सहामाही, तिमाही पद्धतीने हप्ता भरण्याची सुविधा आहे. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी मासिक (ईसीएस) पद्धतीनेही विमाहप्ता भरता येणार आहे. भारतातील सरासरी आयुर्मान वाढत असून निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी तसेच वृद्धावस्थेतील जीवनासाठी काही तरी तरतूद करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी न्यू जीवन निधी ही विमा योजना आणल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. ही निवृत्तिवेतन योजना असूनही त्यात देण्यात आलेले जोखीम संरक्षण हे या योजनेचे मुख्य वैशिष्टय़ आहे. तसेच या योजनेत पहिल्या पाच वर्षांसाठी ५० रुपये प्रतिहजारी, प्रतिवर्षी या दराने सुनिश्चित लाभ दिला जाणार जाईल व त्यानंतर बोनस जमा होत राहणार आहे.