मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते दिवंगत मा. दत्ताराम यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मा. दत्ताराम यांच्याविषयीच्या आठवणींचा पट उलगडला आणि उपस्थित रसिकांना मा. दत्ताराम यांच्या अनेक पैलूंचे दर्शन घडविले.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरातील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये झालेल्या ‘आठवणीतील मा. दत्ताराम’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटककार सुरेश खरे यांनी केले.
या वेळी ज्येष्ठ अभिनेते-गायक रामदास कामत यांनी त्यांच्या समवेत काम करत असलेल्या ‘कच-देवयांनी’ या नाटकातील एका प्रसंगाची आठवण सांगून मा. दत्ताराम यांना त्याच्याकडून झालेल्या एका चुकीची कशी बोचणी लागून राहिली होती, ते सांगितले. ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी सांगितले की, मा. दत्ताराम यांच्या अभिनयात सहजता होती. रंगभूमीवर त्यांचा वावरही राजेशाही असायचा. ‘चंद्र नभीचा ढळला’ नाटकात मी त्यांच्याबरोबर काम केले होते. त्यांचा अभिनय पाहताना भारावून जायला व्हायचे. अभिनेत्री फैय्याज म्हणाल्या की, पद्य भूमिका करताना जसे सूर, ताल आणि लय याला महत्त्व आहे तसेच ते गद्य भूमिकेतही असले पाहिजे. गद्य भूमिकेतील संवाद सादर करताना शब्दांची फेक, उच्चार आणिते सादर करणे यालाही महत्वाचे स्थान आहे. मा. दत्ताराम यांच्यावर पुस्तकाची निर्मिती केलेले नाटय़समीक्षक अरुण घाडीगावकर यांनी सांगितले की, मा. दत्ताराम यांनी प्रयोगापूर्वी रंग आणि वेशभूषा केली ते त्या भूमिकेत शिरायचे. त्यांना आजूबाजूचा विसर पडायचा. पण प्रयोग संपला की ते पुन्हा त्या भूमिकेतून पूर्णपणे बाहेर यायचे.
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, अभिनेते मोहनदास सुखटणकर, रंगभूषाकार कृष्णा बोरकर, मा. दत्ताराम यांचा मुलगा नाना, रांगोळी कलाकार कमलाकर भोजी आदींनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सांस्कृतिक कार्यसंचालक आशुतोष घोरपडे, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे माजी अध्यक्ष हेमंत टकले या वेळी उपस्थित होते.