अवैध दारूविक्रीसंबंधी अनेक वेळा तक्रारी दिल्या. मात्र, पोलीस काहीही दखल घेत नसल्याचे पाहून रुद्रावतार धारण करीत रणरागिणींनी पुढाकार घेत अवैध दारू तर पकडलीच, तसेच विक्रेत्यालाही यथेच्छ चोप दिला. औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ गावातील महिलांनी केलेल्या या कारवाईने पोलीस यंत्रणाही कामाला लागली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
लिंबाळा दाऊ परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रोजच भटकंती करावी लागते, पण अवैध दारू गावोगावी मुबलक मिळते. पाण्याच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलांना दारूच्या भरघोस विक्रीमुळे मोठा त्रास होत होता. ग्रामसभा, पोलीस ठाणे अशा सर्व ठिकाणी तक्रारी करून, गाऱ्हाणे मांडूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. त्यामुळे संतप्त होत या रणरागिणींनी स्वत:च पुढाकार घेत अवैध दारू पकडली व पोलिसांना गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले.पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांना अवैध दारू विक्रीसंबंधी माहिती दिल्यानंतर पोलीस येण्याअगोदर विक्रेता आवराआवर करायचा व पोलिसांच्या हाती काहीच लागायचे नाही. पोलीस व अवैध दारू विक्रेत्यांची मिलीभगत असल्यामुळे महिला वैतागून गेल्या होत्या. दारू विक्रेते सरपंच व ग्रामस्थांनाही जुमानत नव्हते. दारू विक्रेत्यांना चोप देऊन महिलांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेले, तेव्हा पोलीस ठाण्यास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. किल्लारी पोलिसांना महिलांच्या सहकार्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांना पकडणे शक्य झाले, आता शंभर टक्के अवैध दारू विक्री बंद करू, असा त्यांनी पवित्रा घेतला आहे. त्यांचा हा पवित्रा किती काळ टिकणार? याकडे परिसरातील लोकांचे लक्ष लागून आहे. लिंबाळा गावच्या महिलांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळे गावोगावच्या महिला आता पदर खोचून तयार होत आहेत.