‘बुलेट राजा’ मुळे अडचणीत स्थानिक ‘प्रजा’

चित्रपट आणि वास्तव यात जमीन-आसमानचे अंतर. वास्तवात समस्यांचे डोंगर असल्याने मनुष्याला कचकडय़ातील ते जगणे नेहमीच आकर्षित करते. क्षणिक विरंगुळा म्हणून ते ठीक असते. कारण, वास्तवात आल्यावर मूळ समस्या कायमच राहतात.

चित्रपट आणि वास्तव यात जमीन-आसमानचे अंतर. वास्तवात समस्यांचे डोंगर असल्याने मनुष्याला कचकडय़ातील ते जगणे नेहमीच आकर्षित करते. क्षणिक विरंगुळा म्हणून ते ठीक असते. कारण, वास्तवात आल्यावर मूळ समस्या कायमच राहतात. त्यातही या दुनियेचे तारे प्रत्यक्षात दिसणार म्हटल्यावर बघ्यांची गर्दी होणे स्वाभाविकच. अशाच एका चित्रपटाचे चित्रीकरण आणि ते पाहण्यासाठी जमलेली बघ्यांची गर्दी, यामुळे गोदाकाठावरील स्थानिक नागरिक व आसपासचे व्यावसायिक सलग दोन दिवसांपासून वेठीस धरले गेले असून त्यांच्या दैनंदिन समस्यांमध्ये भर पडली आहे. चित्रीकरणामुळे आठवडे बाजाराच्या दिवशी यशवंतराव महाराज पटांगण परिसर स्थानिकांसह वाहनधारकांना जणूकाही बंदच करण्यात आला.
शहरातील गोदाघाट परिसरात मंगळवारी सुरू झालेले ‘बुलेट राजा’ चित्रपटाचे चित्रीकरण स्थानिक नागरिकांसाठी दुहेरी डोकेदुखी ठरल्याचे दिसत आहे.
अभिनेता सैफ अली खान व इतर कलावंतांसह २०० जणांचे पथक या भागात काही दिवस चित्रीकरण करणार असल्याचे सांगितले जाते. गोदाघाटावरील निळकंठेश्वर मंदिराच्या समोरील बाजूस हे चित्रीकरण सुरू आहे.
याची माहिती कर्णोपकर्णी पसरल्याने सिनेतारकांना पाहण्यासाठी बघ्यांची बरीच गर्दी जमली. चित्रीकरणात कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून बाहुबली सुरक्षारक्षकांनाही तैनात करण्यात आले. संबंधितांनी रामसेतू पुलाजवळून मार्गस्थ होणारे छोटे रस्ते दोरखंड लावून बंद केले. रविवार कारंजा परिसरातून जाणाऱ्या स्थानिक वाहनधारकांना यामार्गे पुढे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला. पादचारी व भाविकांची अवस्था वेगळी नव्हती.
नदीच्या पलीकडे पायी जाऊ इच्छिणाऱ्यांनाही सुरक्षारक्षकांकडून रोखण्यात आले. परिणामी, वयोवृद्धांसह शेकडो नागरिकांना दूरवरून पायपीट करावी लागली. नदीपात्रालगत मोठय़ा प्रमाणात नागरी वस्ती आहे. सराफ बाजार, पगडबंद लेन, बोहोरपट्टी, भांडी बाजार, कापडबाजार या परिसरातील व्यावसायिकांसह स्थानिकांना चित्रीकरणामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या परिसरात शहरवासीय व भाविकांचा मोठा राबता असतो. त्यात बुधवार हा आठवडे बाजाराचा दिवस. नदीपात्रालगत असणाऱ्या आठवडे बाजारात चारही दिशांकडून नागरिक येत असतात. त्यांना बाजार गाठण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागला.
चित्रीकरण व गर्दीमुळे स्थानिक नागरिकांना नाहक जाच सहन करावा लागल्याने पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी नाराजी व्यक्त केली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने जो ज्याला जमेल तेथून चित्रीकरण पहाण्यात मग्न होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Local residents in trouble due to bullet raja shooting