मुंबईमधील कामगार संपला अशी स्थिती असतानाच पुन्हा एकदा कामगारांनी एल्गाराचा पवित्रा घेतला असून १८ फेब्रुवारीस राणीबाग भायखळा ते आझाद मैदान असा ‘लाँग मार्च’ काढण्यात येणार आहे. २० आणि २१ फेब्रुवारीस पुकारण्यात आलेल्या दोन दिवसीय भारत बंदची पूर्वतयारी म्हणून हा मार्च काढण्यात येणार असल्याचे कामगार संघटना संयुक्त कृती समितीने जाहीर केले आहे.
संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन वर्षांत अनेक आंदोलने करण्यात आली. दोन वेळा देशव्यापी संप, तीन वेळा देशव्यापी जेलभरो आणि सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. दोन वेळा संसदेवर मोर्चा नेण्यात आला. मात्र सरकारकडून या मागण्यांकडे डोळेझाक करण्यात आली. अलीकडेच मुंबईत झालेल्या ‘आयटक’च्या अधिवेशनात २० आणि २१ फेब्रुवारीस ‘भारत बंद’ पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
११ केंद्रीय कामगार संघटना, केंद्रीय कामगार संघटना महासंघ तसेच स्वतंत्र कामगार संघटनांनी हा बंद पुकारला आहे. या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष प्रणीत कामगार संघटना सहभागी होणार आहेत. २० फेब्रुवारीस मुंबईत बंद पाळण्यात येणार आहे. मुंबईमध्ये या बंदची तयारी करण्यासाठी आणि कामगारांच्या शक्ती प्रदर्शनासाठी १८ फेब्रुवारीचा लाँग मार्च काढण्यात येणार असून त्यात दोन लाख कामगार सहभागी होणार आहेत. रेल्वे कामगार या बंदमध्ये सहभागी होणार नसले तरी रेल्वे रोखण्यात येणार असल्याचे भाकपचे नेते कॉ. प्रकाश रेड्डी यांनी सांगितले. बंदरे, तेल कंपन्या, परिवहन कामगार यांच्यासहीत शिक्षक-प्राध्यापक, फेरीवाले, विमा कामगार, पालिका कामगार या संपामध्ये सहभागी होणार आहेत.